
मुंबई :
गेल्या एक दशकापासून अन्यभाषकांसाठी विविध स्तरातील संवादात्मक मराठी अभ्यासक्रमाची रचना करून यशस्वी विद्यार्थी घडवणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागात यावर्षीच्या संवादात्मक मराठी अभ्यासक्रम स्तर १ चे वर्ग (प्रारंभिक अभ्यासक्रम) आजपासून सुरू झाले आहेत. हा अभ्यासक्रम रविवारी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत एक वर्षासाठी ऑनलाइन पद्धतीने शिकवला जातो. या अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरू आहे.
मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागामार्फत काही वर्षांपासून ऑनलाइन प्रत्यक्ष संवादात्मक मराठी अभ्यासक्रम राबविले जात आहेत. या अभ्यासक्रमांतून विद्यार्थ्यांना मराठी बोलणे, वाचणे, लेखन आणि ऐकणे (समजून घेणे) ही कौशल्ये मजेशीर आणि शिस्तबद्ध पद्धतीने शिकवली जातात. यासोबतच व्याकरण, शब्दसंपत्ती आणि संवाद कौशल्यांचा सखोल सराव देखील केला जातो. प्रमाणपत्र अभ्यासक्रम (Certificate Course) हा स्तर १ म्हणजे नवशिक्यांसाठी आहे. प्रवेश व वर्ग दोन्ही ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध आहेत. संवादात्मक मराठी अभ्यासक्रमांचे एकूण ६ स्तर आहेत. सध्या पहिले तीन स्तर मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागामार्फत शिकवले जात आहेत. हे अभ्यासक्रम भारतीय आणि विदेशी विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. सध्या एक जपानी आणि एक अमेरिकी विद्यार्थी, भारतीय विद्यार्थ्यांसह संवादात्मक मराठीचा दुसरा स्तर शिकत आहेत.
हे अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाच्या (जर्मन विभाग) यांच्याद्वारे राबविण्यात आलेल्या एका यशस्वी प्रकल्पाचा भाग आहेत. या प्रकल्पामध्ये मराठी तज्ज्ञ, अभिनेते आमिर खान (आर्थिक सहकार्य), राज्य मराठी विकास संस्था (आर्थिक सहकार्य) आणि जर्मन भाषा अध्यापनशास्त्राचे योगदान आहे. या प्रकल्पांतर्गत ६ स्तरांकरिता मराठी शिकण्यासाठी पाठ्यपुस्तके, कार्यपुस्तिका आणि ऑडिओ-व्हिज्युअल साहित्य तयार करण्यात आले आहेत.
मराठी शिकण्यासाठी सर्व पुस्तके आणि ऑडिओ-व्हिज्युअल साहित्य मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विनामूल्य डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत. तसेच ऑनलाइन मराठी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया याच संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे विभागप्रमुख प्रा. विभा सुराणा यांनी सांगितले. विभागामार्फत २५ किंवा त्याहून अधिक विद्यार्थ्यांच्या गटासाठी सानुकूल अभ्यासक्रम देखील तयार करू शकत असल्याचेही त्यांनी सांगितले. अधिक माहिती मुंबई विद्यापीठाच्या german-mu.com या संकेतस्थळावरून किवा germandept.head@mu.ac.in इथून प्राप्त केली जाऊ शकेल.
मराठी शिकवणारी पुस्तकेही तयार
- रिक्षाचालक व टॅक्सीचालकांसाठी मराठी
- परिचारिकांसाठी (नर्सेससाठी) मराठी
- बँक कर्मचाऱ्यांसाठी मराठी
- शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मराठी