शिक्षण

Marathi language : अमेरिका, कॅनडामधील १०३ मुलांनी दिली मराठी भाषेची परीक्षा

इयत्ता पहिली ते आठवीतील १०३ विद्यार्थ्यांचा निकाल

मुंबई :

परदेशात स्थानिक झालेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी आपल्या मुलांना उत्तम मराठी यावे व त्यांची संस्कृतीशी नाळ टिकून राहावी यासाठी राज्य सरकारच्या महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या माध्यमातून यंदा प्रथमच मराठी भाषा विषयाची मूल्यमापन परीक्षा घेतली. अमेरिका, कॅनडा आणि डेन्मार्कमधील १०३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेमध्ये २४ विद्यार्थी ए१ श्रेणी तर ५२ विद्यार्थी ए २ श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर बृहन्महाराष्ट्र मंडळ नॉर्थ अमेरिका व महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभाग यांच्यामध्ये अनिवासी भारतीय मराठी पालकांच्या मुलांना मराठी भाषा शिकता यावी यासाठी डिसेंबर २०२४ मध्ये सामंजस्य करार झाला. या करारासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या मराठी शाळांचे प्रमुख राहुल देशमुख यांनी पुढाकार घेतला होता. या करानुसार बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या कॅनडा, डेन्मार्क व अमेरिकेतील एकूण ६० शाळांच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची जानेवारीपासून नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये १०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. या विद्यार्थ्यांना जानेवारीपासून मराठी भाषा शिकविण्यात आली. ‘सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यांकन’ पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांचे वर्गामध्ये मूल्यांकन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत १८ मे २०२५ रोजी प्रथमच प्रवेशित विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा बालभारतीद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या मराठी भाषा पुस्तकांच्या अभ्यासक्रमावर घेण्यात आली. या मू्ल्यमापन परीक्षेचा निकाल ९ जुलै २०२५ रोजी दुपारी २ वाजता राज्य मंहळाच्या www.msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. या परीक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यातील २४ विद्यार्थ्यांनी ए१ श्रेणी, ५२ विद्यार्थ्यांनी ए२ श्रेणी, १८ विद्यार्थ्यांना बी१ श्रेणी, ४ विद्यार्थ्यांना बी२ श्रेणी, एका विद्यार्थ्याला सी१ आणि ४ विद्यार्थ्यांनी सी२ श्रेणी मिळाली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाचे समन्वयक राजेंद्र आंधळे यांनी दिली.

प्रशिक्षकांना दिले ऑनलाईन प्रशिक्षण

महाराष्ट्रातून परदेशात स्थायिक झालेल्या मात्र मराठी भाषेचे उत्तम ज्ञान असलेल्या व्यक्ती बृहन्महाराष्ट्र मंडळाकडून निवडण्यात आल्या. त्यांना मुक्त विद्यालय मंडळाकडून त्यांना भाषा कशी शिकवायची, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे, त्यांची परीक्षा कशी घ्यायची याचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर या प्रशिक्षित तज्ज्ञांमार्फत विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकवण्यात आली.

कशी घेण्यात आली परीक्षा

राज्य मुक्त विद्यालय मंडळाकडून बृहन्महाराष्ट्र मंडळाला बालभारती अभ्यासक्रमावर प्रश्नपत्रिका ऑनलाईन पाठविण्यात आल्या. त्यावर त्यांनी परीक्षा घेतल्यानंतर मुक्त विद्यालय मंडळाकडून आदर्श गुणपत्रिका पाठविण्यात आल्या. त्यानुसार प्रशिक्षित भाषा तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्यात आल्या. तसेच विद्यार्थ्यांचे वर्गातील मूल्यमापन यांचे एकत्रित गुण बृहन्महाराष्ट्र मंडळाकडून राज्य मुक्त विद्यालय मंडळाकडे पाठविण्यात आले. त्यानंतर मंडळाकडून बुधवारी निकाल जाहीर करण्यात आला.

विद्यार्थांना काय फायदा होणार

पहिली ते आठवीपर्यंत भाषा विषयाचे ज्ञान घेतलेल्या विद्यार्थ्यांना राज्य मुक्त विद्यालय मंडळाकडून प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच पाश्चत्य देशामध्ये विद्यार्थ्यांनी परदेशी भाषा शिकल्यास त्याला क्रेडिट पॉईंट मिळतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकल्याचे क्रेडिट पॉईंट मिळणार असून, याचा त्यांना पुढील भविष्यामध्ये लाभ होणार आहे. त्याचप्रमाणे यामुळे परदेशात वाढणाऱ्या मराठी मुलांना त्यांची भाषा व संस्कृती याची माहिती होण्यास मदत होणार आहे.

आणखी चार देशांमध्ये शिकविणार मराठी भाषा

बृहन्महाराष्ट्र मंडळ व राज्य मुक्त विद्यालय मंडळाकडून घेण्यात आलेली ही परीक्षा यंदा अमेरिका, कॅनडा व डेन्मार्क या देशांमध्ये प्रथमच घेण्यात आली. मात्र पुढील वर्षात ही परीक्षा ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, संयुक्त अरब अमिराती आणि नार्वे या चार देशांमध्ये घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सध्या जपानमध्ये ही परीक्षा घेण्यासंदर्भात तेथील अनिवासी भारतीय मराठी पालकांसोबत चर्चा सुरू असल्याचे राजेंद्र आंधळे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *