शहर

कोळीबांधवांची नवीन इमारतीसाठी ४०० कोटी रुपये खर्चून ३० वर्षांचा भाडेकरार करण्याची तयारी

छत्रपती शिवाजी महाराज मंडईची इमारत अतिधोकादायक घोषित झाल्याने, मासळी विक्रेत्यांची स्थानिक परिसरात नजीकच्या ठिकाणी स्थलांतर करण्याची विनंती

छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील मासळी विक्रेत्यांचे पुनर्सन कॉफर्डमार्केट येथील महात्मा जोतिबा फुले मंडई पुनर्विकास प्रकल्पातील इमारतीमध्ये केले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज मंडईची इमारत अतिधोकादायक घोषित झाल्याने, मासळी विक्रेत्यांची स्थानिक परिसरात नजीकच्या ठिकाणी स्थलांतर करण्याची विनंती मासळी विक्रेते, कोळी बांधव व संबंधित संघटनांनी तसेच लोकप्रतिनिधींनी महानगरपालिकेकडे केली होती. त्यानुसार महानगरपालिकेने पुनर्वसनाची कार्यवाही केली आहे. नवीन इमारतीमध्ये आवश्यक तसेच अत्याधुनिक अशा सर्व सेवा-सुविधा देखील पुरवण्यात आल्या असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

मंडईतील परवानाधारक ३४८ मासळी विक्रेत्यांचे विविध ठिकाणच्या मंडईमध्ये पर्यायी स्थलांतर करुन पालिका प्रशासनाने जुलै २०२१ मध्ये ही इमारत रिकामी केली. छत्रपती शिवाजी महाराज मंडई भूखंडापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या महात्मा जोतिबा फुले मंडईचा (पूर्वीचे क्रॉफर्ड मार्केट) पुनर्विकास प्रस्तावित होता. या पुनर्विकासाचे नियोजन व आराखड्याचे कामकाज सन २०१४-२०१६ या कालावधीमध्ये सुरु असताना महानगरपालिकेने या पुनर्विकास प्रकल्पामध्ये सदर मासळी विक्रेत्यांसाठी एका इमारतीची तजवीज त्याचवेळी केली.

पुनर्विकसित नवीन इमारतीमध्ये सदर मासळी विक्रेत्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात येणार आहे. या इमारतीत वीज, पाणी, प्रसाधनगृह यासारख्या आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. अग्निशमन सुरक्षा मंजुरी प्राप्त झाली असून इमारत भोगवटा प्रमाणपत्र देखील लवकरच प्राप्त होईल. त्यामुळे या इमारतीमध्ये जागा वाटपाची प्रक्रिया ऑगस्ट २०२५ मध्ये सुरु करण्याचे पालिकेचे नियोजन आहे.

कोळीबांधवानी नवीन इमारतीसाठी ४०० कोटी रुपये खर्चून ३० वर्षांचा भाडेकरार करण्याची तयारी दर्शवली आहे. अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. कोळी समाज या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा मासळी बाजार तयार करू इच्छितो. महसूल वाढवण्याच्या दृष्टीने पलटण मार्गावरील सीटीएस १५०० हा भूखंड लिलावाद्वारे खासगी कंपनीला ३६९ कोटी रुपये रकमेत देण्यात आल्याचे समजल्यानंतर या भूखंडावर असलेल्या मासळी बाजाराबद्दल कोळी बांधवांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या लिलावामध्ये ३६९ कोटी रुपयांना हा भूखंड देण्यात आल्याचे समोर आल्यानंतर यापेक्षा अधिक पैसे मोजण्याची तयारी कोळी बांधवांनी दाखवली आहे. यावर माध्यमांना दिलेल्या माहितीमध्ये मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी सांगितले की, महामुंबई परिसरच नाही, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधून, तसेच पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश या राज्यांमधूनही या बाजारात माशांचे संकलन होते. त्यामुळे हा भूखंड कोळी समाजाला मिळाला, तर तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा मासळी बाजार तयार करण्यात येईल.

पूर्वीच्या मंडईच्या तुलनेत नवीन मंडईच्या ठिकाणी अद्ययावत व वाढीव सुविधा नव्या इमारतीमध्ये देण्यात येणार आहेत. मोठ्या प्रमाणावर मासळी साठवणी साठी शीतगृह, ७४ चारचाकी वाहन क्षमतेचे वाहनतळ, मालाची चढउतार करण्यासाठी उतार (रॅम्प), धक्का (लोडिंग – अनलोडिंग प्लॅटफॉर्म), सरकता पट्टा, लिफ्ट, सांडपाणी पुनर्प्रक्रिया यासारख्या सुविधांचा त्यात समावेश आहे. तथापि, महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, “जीर्ण झालेल्या मार्केट इमारत रिकामी केल्यानंतर, सार्वजनिक निविदाद्वारे रिक्त भूखंड भाड्याने देण्याची प्रक्रिया जवळजवळ सहा महिन्यांपूर्वी सुरू झाली. त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि या टप्प्यावर बदल करणे आता शक्य नाही.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *