
मुंबई :
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता 5 वी) शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी) चा अंतिम निकाल आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. शिष्यवृत्तीचा एकूण निकाल २२.०६ टक्के इतका लागला असून, यामध्ये इयत्ता पाचवीचा निकाल २३.०९ टक्के तर इयत्ता आठवीचा निकाल १९.३० टक्के इतका लागला आहे. एकूण निकालामधील ३१ हजार ७८६ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून, त्यातील इयत्ता पाचवीमधील १६ हजार ६९३ विद्यार्थ्यांना तर आठवीतील १५ हजार ९३ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीसाठी ९ फेब्रुवारी २०२५ रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी राज्यभरातून ९ लाख ४४ हजार ४६३ विद्यार्थांनी नोंदणी केली होती. यामध्ये इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्तीसाठी ५ लाख ६६ हजार ३६८ तर इयत्ता आठवीसाठी ३ लाख ७८ हजार ९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील ९ लाख १३ हजार २५८ विद्यार्थी उपस्थित राहिले होते. यामध्ये इयत्ता पाचवीतील ५ लाख ४७ हजार ५०४ आणि इयत्ता आठवीतील ३ लाख ६५ हजार ७५४ विद्यार्थी उपस्थित होते. या दोन्ही शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतरिम निकाल २५ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला होता. २५ एप्रिल ते ४ मे या कालावधीमध्ये गुणपडताळणीसाठीचे अर्ज शाळांकडून ऑनलाईन मागविण्यात आले होते. या कालावधीमध्ये आलेले अर्ज निकाली काढून अंतिम निकाल व गुणवत्ता यादी परिषदेकडून जाहीर करण्यात आला. परिषदेने जाहीर केलेल्या निकालानुसार इयत्ता पाचवीतील १ लाख ३० हजार ८४६ आणि इयत्ता पाचवीतील ७० हजार ५७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शिष्यवृत्तीचा एकूण निकाल २२.०६ टक्के इतका लागला असून, यामध्ये इयत्ता पाचवीचा निकाल २३.०९ टक्के तर इयत्ता आठवीचा निकाल १९.३० टक्के इतका लागला आहे. तर शासनमान्य मंजूर संचानुसार शिष्यवृत्तीसाठी पाचवीतील १६ हजार ६९३ विद्यार्थी तर आठवीतील १५ हजार ९३ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
किती मिळते शिष्यवृत्ती
इयत्ता पाचवीचे शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील तीन वर्षासाठी वार्षिक पाच हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळते. तर इयत्ता आठवीची शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना पुढील दोन वर्षासाठी वार्षिक साडेसात हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळते.
शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थी
संच – इयत्ता पाचवी – इयत्ता आठवी
राष्ट्रीय ग्रामीण – – ३४० – ३४०
ग्रामीण सर्वसाधारण – ८१२४ – ६४२६
शहीर सर्वसाधारण – ७८६३ – ६४३०
सर्वसाधारण मुले/मुली – २४३ – १४१
सर्वसाधारण मुली – १९ – २१
मागासवर्गीय मुले/मुली – ९३ – १६
मागासवर्गीय मुली – ११ – १३
तालुकास्तरीय शिष्यवृत्ती – इयत्ता आठवी
ग्रामीण सर्वसाधारण – ११२३
ग्रामीण अनुसूचित जाती – २४६
ग्रामीण भूमिहीन शेतमजूराचा पाल्य – २७०
ग्रामीण आदिवासी – ६७