
मुंबई :
होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीची सराव करण्यास व त्यांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे (एमएमसी) नोंदणी करण्याच्या प्रक्रियेला १५ जुलैपासून सुरुवात करण्यात येणार आहे. त्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) ११ जुलै रोजी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व खासगी रुग्णालयातील रुग्णसेवा शुक्रवारी सकाळी ८ ते शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ठप्प राहणार आहे. या कालावधीत बाह्यरुग्ण, आंतररुग्ण सेवा तसेच शस्त्रक्रिया बाधित होणार आहेत.
राज्य सरकारने ३० जून रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार १५ जुलैपासून सीसीएमपी हा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये नोंदणी करण्याच्या प्रक्रियेस सुरूवात करण्यात येणार आहे. मात्र होमिओपॅथी डॉक्टरांना एका वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करून ॲलोपॅथीचा सराव करण्यास मान्यता देणे हे चुकीचे आहे. हा प्रकार रुग्णांच्या आरोग्याशी खेळणार आहे. आपत्कालिन परिस्थितीमध्ये चुकीचे औषधोपचार, चुकीचे निदान झाल्यास रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ राज्यातील आयएमएने शुक्रवारी राज्यातील सर्व खासगी रुग्णालये, नर्सिंग होम, क्लिनिक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत राज्यातील सर्व खासगी रुग्णालये, नर्सिंग होममधील बाह्यरुग्ण सेवा व आंतररुग्ण सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच या कालावधीतील शस्त्रक्रिया ही रद्द करण्यात आल्या आहेत. या आंदोलामध्ये आयएमएशी संलग्न असलेल्या ६० हजार डॉक्टर तसेच एएमएसी, बालरोग तज्ज्ञ, स्त्री रोग तज्ज्ञ अशा विविध डॉक्टरांच्या संघटनांनी या संपाला पाठिंबा दिला आहे. तसेच राज्यातील नर्सिंग होममधील डॉक्टर असे जवळपास १ लाख ८० हजार डॉक्टर संपामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती आयएमए महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम यांनी दिली. आयएमएने पुकारलेल्या या संपाला राज्यातील मार्ड, मॅग्मो, एमएसआरडीए या सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांच्या संघटनांकडूनही पाठिंबा दर्शविण्यात आला असल्याचेही डॉ. कदम यांनी सांगितले.
७६०० डॉक्टरांची होणार नोंदणी
होमिओपॅथी डॉक्टरांसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करून हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांची स्वतंत्र नोंदणी करण्याची तरतूद २०१४ मध्ये एमएमसीच्या कायद्यामध्ये करण्यात आली आहे. त्यावर आयएमएने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने या निर्णयावर कोणतीही स्थगिती आणलेली नाही. त्यामुळे या निर्णयाची अमलबजावणी करण्यात यावी, असा अभिप्राय विधी व न्याय विभागाने राज्य सरकारला दिला आहे. त्यानुसार सरकारने या निर्णयाची अमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मागील १० वर्षांमध्ये जवळपास ७६०० डाॅक्टरांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरांची नोंदणी १५ जुलैपासून करण्यात येणार आहे.
मार्गदर्शक तत्त्वे तयार करणार
ब्रिज कोर्स पूर्ण करणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांना पूर्णपणे ॲलोपॅथीचा सराव करण्यास मुभा देण्यात येणार नाही. ही बाब रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने सीसीएमपी या ब्रिज कोर्सचा अभ्यास करून होमिओपॅथी डॉक्टरांनी किती सराव करावा यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येणार आहेत. त्यानंतरच होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीचा सराव करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे प्रशासक डॉ. विंकी रुघवानी यांनी दिली.