
मुंबई :
शिक्षण क्षेत्रात ‘महाशक्तिशाली’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यावर अखेर निलंबनाची कारवाई झाली आहे. मागील तारखा टाकून शालार्थ आयडी वाटप, बनावट व बॅकडेट नियुक्त्या, तसेच लाखो रुपयांचे अनधिकृत आर्थिक व्यवहार करणाऱ्या मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांना निलंबित करण्यात आले आहे. हा निर्णय भाजप आमदार संजय उपाध्याय यांच्या गंभीर आरोपानंतर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी घेतला.
उपाध्याय यांनी विधानसभेत सांगवे यांच्या भ्रष्ट कारभाराचे अनेक पुरावे सादर करत १५ प्रमुख घोटाळ्यांची यादीच मांडली. त्यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील २५० जागा भरताना झालेला मोठा गैरव्यवहार, ऑनलाईन प्रवेशात अपारदर्शकता, भरतीबंदी असताना भरती, रात्रशाळा घोटाळा अशा विविध प्रकरणांचा समावेश होता. त्यांच्या सादरीकरणानंतर सभागृहात संगवे यांच्या निलंबनाची जोरदार मागणी केली.
“कोणी काही करू शकत नाही” असा संगवे यांचा माज
संजय उपाध्याय म्हणाले की, “हा अधिकारी सतत ‘माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही’ असं आव्हान देत होता. मागील तारखा वापरून लाखोंच्या फायली मंजूर करून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली गेली.” संगवे याच्याविरोधात लक्षवेधी मांडली जाणार असल्याची खबर कळताच अनेक दलाल आमच्याशी संपर्क करत होते. काही अधिकाऱ्यांनी आमच्यावर रेकी करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
१३ वर्षे एकाच विभागात, तरीही बदली नाही
संदीप संगवे गेल्या १३ वर्षांपासून मुंबई विभागातच कार्यरत होते. दोनदा बढती होऊनही विभाग बदलण्यात आला नाही. २००० हून अधिक शालार्थ आयडी वाटपाच्या प्रक्रियेत शिक्षकांची आर्थिक व मानसिक पिळवणूक झाली. उच्च न्यायालयाने या प्रकरणात त्यांना ३.५ लाखांचा दंड ठोठावला होता. बालहक्क आयोगाने शाळांना बोगस मान्यता देण्याबाबतही चौकशी केली होती. तरीही संगवे यांची बदली होऊ शकली नाही, ही बाब आश्चर्यकारक आहे.
सभागृहात गोंधळ, सर्वपक्षीय मागणीला प्रतिसाद
रणधीर सावरकर यांनी गौप्यस्फोट करत सांगितले की, “हा अधिकारी संपूर्ण विधानसभा मॅनेज करण्यासाठी कोटीच्या व्यवहारात सहभागी आहे. गोपीचंद पडळकर यांनीही मुद्दा ठासून मांडला. यावर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आठवड्याभरात चौकशी करून कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर सभागृहात गोंधळ उडाला आणि सर्वपक्षीय सदस्यांनी संगवे यांचे निलंबन मागितले.
शिक्षक परिषदेचा ठाम पाठिंबा
या प्रकरणात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष व आमदार नागो गाणार तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद राज्य कार्यकारिणी व मुंबई विभाग शिक्षक परिषदेने तीव्र आवाज उठवला. पिडीत शिक्षकांचे दुःख सन्माननीय सदस्यांपर्यंत पोहोचवले.
शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केली निलंबनाची व S.I.T. चौकशीची घोषणा
“या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आयएएस, आयपीएस व शिक्षण तज्ञांच्या विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली जाईल. दोषींना कोणतीही माफी दिली जाणार नाही. चौकशी पूर्ण होईपर्यंत संदीप संगवे यांना निलंबित करण्यात येत आहे,” अशी घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सभागृहात केली.