
मुंबई :
२०२४ च्या अखेरीस अनिमेश (५३) यांची तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने एस. एल. रहेजा हॉस्पिटल, माहीम या हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. येथील HPB अँड लिव्हर ट्रान्स्प्लान्टचे विभागप्रमुख डॉ. विक्रम राऊत, कन्सल्टन्ट आणि क्रिटिकल केअर विभागप्रमुख डॉ. संजित शशीधरन व IDL केअर विभागाचे चेअरमन डॉ. विनय धीर यांचा समावेश असलेल्या टीमने मेटॅबॉलिक डिसफंक्शन – असोसिएटेड स्टीआटोसिस लिव्हर डिजिज (MASLD), हा शेवटच्या टप्प्यातील यकृताचा आजार असल्याचे निदान केले. आपल्या पतीचे प्राण वाचविण्यासाठी रत्ना स्वेच्छेने आपल्या यकृताचा भाग दान करण्यास पुढे आल्या व लग्नाचे मजबूत नाते खरोखरीच वेदनाहारी ठरू शकते, नवसंजीवनी देऊ शकते करू शकते हे त्यांनी सिद्ध केले.
बँकिंग क्षेत्रात सीनिअर एक्झेक्युटिव्ह म्हणून काम करणारे अनिमेश हे २०२४ मध्ये दिवाळीपूर्वी केस कापून घरी परत आल्यावर त्यांना आपल्या पाठीवर विचित्र खाज सुटल्याचे व चट्टे उमटल्याचे दिसले. त्यांना अँटिबायोटिक्स देण्यात आले. त्यामुळे त्यांना सुरुवातीला बरेही वाटले, मात्र त्यानंतर पोट फुगल्यासारखे वाटणे, भूक न लागणे लक्षणे सतत आढळून येऊ लागली व वजनही लक्षात यावे इतके कमी झाले. एकदा कामावर असताना त्यांच्या नाकातून अचानक रक्त येऊ लागले तेव्हा परिस्थिती खऱ्या अर्थाने बदलून गेली. नाकातून रक्त वाहणे थांबले, तरीही झाल्या प्रकारामुळे एस. एल. रहेजा हॉस्पिटल माहीम येथे तातडीने तपासणासाठी जाण्याची गरज त्यांना भासली. सर्व प्रकारच्या तपासण्या केल्यानंतर अनिमेश यांना MASLD मुळे प्रगत टप्प्यावरील यकृताचा आजार झाल्याचे त्यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आले. ही स्थिती वेगाने गंभीर बनत चालली असून यकृत प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय असल्याची सूचना डॉक्टरांनी दिली. अनिमेश यांची पत्नी रत्ना यांनी जराही वेळ न दवडता दाता बनण्यास स्वेच्छेने होकार दिला.
अनिमेश यांची जीवनशैली या आजारास किती मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरली हे सांगताना रत्ना म्हणाल्या, “तासनतास काम, सततचे आंतरराष्ट्रीय दौरे, अत्यंत तणावपूर्णक निर्णयप्रक्रिया आणि जेवणाच्या अनियमित वेळा हीच माझ्या पतीची जगण्याची पद्धत बनून गेली होती. शारीरिक हालचालींसाठी अगदी थोडा वेळ मिळायचा आणि कामापायी बरेचदा झोपेवर पाणी सोडावे लागायचे. काही वर्षांमध्येच त्यांना रिफ्रॅक्टरी ॲसाइट्स (पोटात पाणी साचणे) आणि हेप्टिक एन्सिफॅलोपथी (यकृत शरीरातील विषद्रव्यांचा निचरा करण्यास असमर्थ ठरल्याने मेंदूचे कार्य मंदावत जाणे) हे विकार जडले. त्यांचे यकृत आता औषधांनी किंवा जीवनशैलीतील बदलांनी वाचवता येणार नव्हते. प्रत्यारोपण ही एकच लाइफलाइऩ त्यांना उपलब्ध होती.
“दाता शोधण्याचा प्रश्न उभा राहिला तेव्हा सुरुवातीला आम्ही माझ्या नणंदेचा विचार केला होता. मात्र त्यांच्या आधीच्या वैद्यकीय पार्श्वभूमीमुळे त्या दाता म्हणून पात्र ठरत नव्हत्या. त्यानंतर आमची अवघ्या २४ वर्षांची मुलगी हा आणखी एक पर्याय होता, पण ती खूप लहान आहे, तिच्यापुढे तिचं संपूर्ण आयुष्य आहे म्हणून माझा या गोष्टीला विरोध होता. तिला कोणताही धोका निर्माण होणे मला नको होते. दाता म्हणून माझा विचार करण्याची विनंती मी डॉक्टरांना केली व इत्यंभूत वैद्यकीय तपासण्यांनंतर आणि मानसशास्त्रीय मूल्यमापनानंतर मला दाता बनण्यास मान्यता देण्यात आली. आमच्या लग्नाला २५ वर्षे झाली आहेत व आम्ही एकत्र मिळून हे आयुष्य उभे केले आहे, त्याच्याशिवाय ते जगण्याची कल्पनाही मला करता आली नसती, म्हणूनच हे सारे मला संयुक्तिक वाटले.”त्या पुढे म्हणाल्या.
हेही वाचा : Fakiriyat : श्री महावतार बाबाजींची महती सांगणाऱ्या ‘फकिरीयत’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
प्रत्यारोपणाविषयी बोलताना एस. एल. रहेजा हॉस्पिटल, माहीमच्या HPB अँड लिव्हर ट्रान्स्प्लान्ट विभागाचे प्रमुख डॉ. विक्रम राऊत म्हणाले, “हे एका जीवित दात्याकडून मिळालेल्या यकृताचे प्रत्यारोपण होते, ज्यात पत्नीच्या यकृताचा एक भाग शस्त्रक्रियेने काढून घेण्यात आला व तो पतीच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आला. मानवी यकृतामध्ये पुनर्जनित होण्याची लक्षणीय क्षमता असते. सर्वसाधारणपपणे काही महिन्यांतच दाता आणि प्राप्तकर्ता यांच्या यकृताचा आकार जवळ-जवळ पूर्ववत होतो. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. शस्त्रक्रियेनंतर अनिमेश यांच्या प्रकृतीमध्ये कोणत्याही अडथळ्याविना सुधारणा झाली आणि काही आठवड्यांतच त्यांना चालता येऊ लागले, नेहमीसारखे खाता येऊ लागले व घरी परतता आले. ट्रान्स्प्लान्ट टीमच्या सहाय्याने त्यांच्या पत्नीही पूर्णपणे बऱ्या झाल्या. वनस्पतीजन्य आहाराचा पर्याय स्वीकारला आहे, ते रोज एकत्र चालायला जातात, ताणतणावांच्या व्यवस्थापनासाठी योगसाधना करतात आणि कामापेक्षा कुटुंबाला वेळ देण्यास प्राधान्य देतात. हा अनुभव दोघांच्याही आयुष्याचा एकाचवेळी कलाटणी देणारा ठरला आहे.
भारतामध्ये MASLD चा प्रादुर्भावर प्रौढांमध्ये सुमारे 39 टक्के, तर मुलांमध्ये 35 टक्के आहे, मात्र लवकर झालेल्या निदान, जीवनशैलीतील बदल आणि आवश्यक असेल तेव्हा वेळच्यावेळी ट्रान्स्प्लान्टेशनसारख्या वैद्यकीय हस्तक्षेपांच्या मदतीने या आजारातून बरे होणे शक्य आहे.