शहर

Ganesh Festival : सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळातील स्वयंसेवकांना महापालिका देणार आपत्कालीन व्यवस्थापनाचे धडे

मुंबई :

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांनी श्रीगणेशोत्सव साजरा करताना कोणती काळजी घ्यावी, आपत्ती उद्भवू नये यासाठी कशी खबरदारी घ्यावी, आपत्ती उद्भवलीच तर आपत्कालीन व्यवस्थापन कसे करावे, याबाबत महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून श्रीगणेशोत्सव मंडळातील स्वयंसेवकांना एकदिवसीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी प्रशासकीय विभाग (वॉर्ड) कार्यालयाकडून सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांशी समन्वय साधण्यात येणार आहे.

यंदाचा श्रीगणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी महानगरपालिकेने नियोजन व कार्यवाही सुरू केली आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून विविध सेवा-सुविधा पुरवितांना पर्यावरणपूरक शक्य तितक्या बाबींचा अवलंब केला जात आहे.

मुंबईतील श्रीगणेशोत्सव महाराष्ट्रासह संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. लाखो भाविक, पर्यटक या उत्सवासाठी मुंबईत येतात. विविध सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्यासाठी देशभरातून भाविक मुंबईत येत असतात. त्यामुळे मंडळांच्या उत्सव मंडपांमध्ये, परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. अशावेळी गर्दीचे नियोजन कसे करावे, कोणतीही दुर्घटना होवू नये यासाठी कोणती काळजी घ्यावी, प्रसाद वाटप करताना कोणती दक्षता घ्यावी, आपत्कालीन कार्यवाही कोणती व कशी असावी, याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक श्रीगणेश मंडळातील दोन स्वयंसेवकांना हे एकदिवसीय प्रशिक्षण दिले जाणार आहे. आपत्कालीन व्यवस्थापनात नागरी सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरणार आहे.

विभाग कार्यालयाकडून प्राप्त झालेली सार्वजनिक मंडळांची यादी उप आयुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सव समन्वयक यांच्यामार्फत आपत्कालीन व्यवस्थापन विभागास उपलब्ध करून देण्यात आली आहे. सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांना द्यावयाच्या एकदिवसीय प्रशिक्षणाचा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सहायक प्रमुख अधिकारी श्री. राजेंद्र लोखंडे व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. विकास कांबळे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती देखील करण्यात आली आहे.

हेही वाचा : app-based buses : ॲपवर आधारित बसेस, कार, बाईक टॅक्सी यावर कारवाई करणार

स्वयंसेवकांना देण्यात येणाऱया प्रशिक्षणात आपत्ती म्हणजे काय, धोक्याची ओळख, जोखमीचे व्यवस्थापन, आपत्तीत काय करावे, काय करू नये, अग्निशमनाची प्रात्यक्षिके, प्रथमोपचार कसा करावा, गर्दीवर नियंत्रण कसे राखावे आदींबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी, मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी, पोलिस अधिकारी, महानगरपालिका रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन विभागाचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांनी महानगरपालिकेच्या या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन उप आयुक्त (परिमंडळ-२) तथा श्रीगणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *