
मुंबई :
इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीसाठी नवीन नोंदणी करण्यासाठी १० ते १३ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना मुदत दिली होती. या चार दिवसांमध्ये राज्यभरातून तब्बल १ लाख ३८ हजार १०१ विद्यार्थांनी नवीन नोंदणी केली आहे. तर ५ लाख ५३ हजार ९०३ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाच्या भाग २ मध्ये नव्याने पसंतीक्रम भरले आहेत.
संपूर्ण राज्यात इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रथमच राबविण्यात येत आहेत. पहिली फेरी ७ जुलै रोजी संपल्यानंतर शिक्षण संचालनालयाकडून दुसऱ्या फेरीसाठी १० ते १३ जुलैदरम्यान नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली होती. या कालावधीत विद्यार्थ्यांना नवीन नोंदणी आणि प्रवेश अर्जाच्या भाग-२ मधील पसंतीक्रम नोंदविण्याची मुभा देण्यात आली होती. दुसऱ्या नियमित फेरीच्या पहिल्या दिवसापासूनच नवीन अर्ज नोंदणी करण्यास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. या चार दिवसांच्या कालावधीत राज्यभरातून तब्बल १ लाख ३८ हजार १०१ विद्यार्थांनी नवीन नोंदणी केली आहे. तर ५ लाख ५३ हजार ९०३ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाच्या भाग २ मध्ये नव्याने पसंतीक्रम भरले आहेत.
हेही वाचा : J.J.Hosptal : दिवसेंदिवस हृदय निकामी होत असलेल्या रुग्णावर जे.जे. रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
दरम्यान अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीमध्ये राज्यभरातून ५ लाख ८ हजार ९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. पहिल्या फेरीमध्ये विज्ञान शाखेतून सर्वाधिक १ लाख ४ हजार १२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले तर त्याखालोखाल वाणिज्य शाखेतून ५८ हजार ९४८ आणि कला शाखेतून ३१ हजार १५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तर १ लाख २४ हजार ९८ विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले आहेत. यातील पहिल्या पसंतीचे महाविद्यालय जाहीर झालेल्या विद्यार्थी वगळता सर्व विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच १ हजार ९४४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन रद्द केले, यामध्ये कोट्यांतर्गत प्रवेश घेऊन रद्द केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३६१ इतकी आहे. त्याचप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयांनी ६ हजार ४०२ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले.
दुसऱ्या प्रवेश फेरीचे वेळापत्रक
नियमित दुसऱ्या फेरीसाठी १७ जुलै रोजी विद्यार्थ्यांची निवडयादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहेत. या दुसरी यादीमध्ये जागा जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना १८ ते २१ जुलै या कालावधीमध्ये प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये रिक्त राहिलेल्या जागा २३ जुलै रोजी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहेत.