
मुंबई :
‘विकसित महाराष्ट्र २०२४७’ या महाराष्ट्र सरकारच्या व्हिजन डॉक्यमुेंटमध्ये जागतिक दर्जाची शैक्षणिक गुणवत्ता तयार करण्यावर भर देण्यात आला असून, त्यासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याची तीन टप्प्यांत अमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानुसार राज्यातील शाळांमध्ये २०२९ पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित शिक्षणपद्धती रुजवणे आणि २०४७ पर्यंत गुरुकुल तत्त्वांवर आधारित जागतिक दर्जाच्या शाळा उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
२०२५ ते २०२९ या कालावधीमध्ये पहिल्या टप्प्यातील कामे करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक शाळेला सुरक्षित, समावेशक व आधुनिक डिजिटल अधोरेखित शिक्षणासाठी सज्ज करण्यात येईल. स्मार्ट क्लासरूम्स, एलएमएस प्रणाली, प्रोजेक्टर आणि एआय आधारित शिक्षणसाधने यांचा समावेश असेल. प्रत्येक तालुक्यात किमान एक ‘पीएम श्री’, ‘सीएम श्री’ किंवा ‘आनंदी गुरुकुल’ शाळा ही मॉडेल शाळा म्हणून विकसित करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात म्हणजे २०३० ते २०३५ या कालावधीत राज्यात ‘इनोव्हेशन क्लस्टर्स’ तयार करून त्यामध्ये आयआयटी, पॉलिटेक्निक यांचा उद्योग जगतासोबत संपर्क वाढविण्यात येणार आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना कौशल्य रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांसाठी कोडिंग क्लब्स, मेकर स्पेसेस, इकोटेक प्रकल्प, तसेच व्यावसायिक दृष्टीकोन विकसित करणाऱ्या कृतींचा समावेश केला जाईल.
हेही वाचा : अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर
त्यानंतर तिसरा टप्पा हा २०३६ ते २०४७ या १२ वर्षांमध्ये राबविण्यात येणार आहे. यामध्ये ग्लोबल बेंचमार्कनुसार विकसित शाळा तयार करून गुरुकुल परंपरेनुसार नैसर्गिक व मूल्याधारित शैक्षणिक वातावरण आणि धुनिक शैक्षणिक सुविधा यांचा समन्वय साधण्यात येणार आहे.
शिक्षकांचेही सक्षमीकरण
‘विकसित महाराष्ट्र २०२४७’ अंतर्गत तयार करण्यात आलेल्या आराखड्यात दरवर्षी शिक्षकांना ५० तासांचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. राष्ट्रीय शिक्षक व्यावसायिक मानदंड (एनपीएसटी) लागू करून शिक्षकांच्या गुणवत्तेत वाढ केली जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या मूलभूत शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन नियोजन
‘निपुण महाराष्ट्र’ उपक्रमाद्वारे इयत्ता ३ रीपर्यंत मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान (एफएलएन) पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. इयत्ता ६ वीपासून व्होकेशनल शिक्षण सुरू करण्यात येईल. यात इव्ही तंत्रज्ञान, डिजिटल मीडिया, अॅनिमेशन, आरोग्य उपकरणे आणि उद्योग ४.० या विषयांचा समावेश असेल. अभ्यासक्रमामध्ये कोडिंग, पर्यावरण जाणीव, जीवनकौशल्यं आणि मूल्यशिक्षण यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.