शहर

मुंबई महानगर प्रदेशातील टॅक्सी, रिक्षा ओला, उबर विरोधात तक्रार करणे झाले सोपे

मुंबई :

शहरातील ऑटोरिक्षा, टॅक्सी, ओला-उबर या प्रवासी वाहने तत्सम प्रवासी वाहनांसंदर्भात भाडे नाकारणे, प्रवाशांशी उध्दटपणे वागणे, मर्यादेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणे, बॅज प्रदर्शित न करता वाहन चालविणे, अतिरिक्त भाडे आकारणे अशा प्रकारच्या प्रवाशांच्या तक्रारींचे निरसन करता यावे. बेशिस्त चालकांविरुध्द कारवाई करता यावी, याकरिता संपूर्ण मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरणासाठी प्रवासी टोल फ्री क्रमांक १८००-२२०-११० सुरु करण्यात आला आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी निवेदनाद्वारे विधानसभेत सांगितले.

परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले, याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पश्चिम), अंधेरी येथे नियंत्रण कक्ष २४ तास सुरु आहे. परिवहन विभागामार्फत प्रथमच अशाप्रकारे नागरिकांसाठी सेवा सुरु करण्यात येत आहे. या कक्षाला प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित कार्यालयास ई-मेलद्वारे अवगत करण्यात येते. दोषी आढळलेल्या वाहन मालकांना नोटीस पाठविण्यात येऊन कारवाई करण्यात येते. त्यांची सुनावणी घेऊन दोषी वाहनांची नोंद ब्लॅकलिस्टमध्ये घेण्यात येते. ब्लॅकलिस्टमध्ये नमूद वाहनांवर दंडात्मक कारवाई होईपर्यंत वाहनांसंबंधीचे पुढील कोणतेही कामकाज करण्यात येत नाही.

हेही वाचा : नॅशनल स्टॉक एक्सचेंजला बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ईमेल

ही कारवाई यापुढे देखील प्रभावीपणे चालू राहणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांनी ऑटोरिक्षा, टॅक्सी, ओला-उबर,प्रवासी बसेस सारख्या प्रवासी वाहनांसंदर्भात काही मदत हवी असल्यास या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी. मुंबई महानगरातील वाहतूकीबाबत सुलभ सेवा निर्माण करण्याकरिता नागरिकांनी या टोल फ्री सेवेचा लाभ घेऊन परिवहन विभागास सहकार्य करावे, असे आवाहनही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *