
मुंबई :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या स्वतःच्या कार्यशाळा व कुशल कामगार असताना सुद्धा कमिशन मिळण्यासाठी कोट्यवधी रुपयांची दुरुस्तीची कामे बाहेरून केली जात असून राज्यभरात गेल्या काही महिन्यात अंदाजे दहा कोटी रुपयांची कामे बाहेरून करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे बेकायदेशीर खरेदी सुद्धा केली जात असून त्यात कमिशनखोरी होत असल्याचा दावा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे, सरचिटणीस, श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
परभणी विभागातील यांत्रिकी व भांडार शाखेतील अधिकाऱ्यांनी स्वतःचे वर्कशॉप आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध असतानाही गेल्या आठ, नऊ महिन्यात सुमारे ५२ लाख रुपये खर्च करून बस दुरुस्तीची कामे बाहेरच्या संस्थांकडून केली आहेत. या कामांसाठी निविदा प्रक्रिया न राबवता नियमबाह्य कामे केल्याचे समोर आले असून त्यात कमिशन घेतले असल्याची शंका उपस्थित होत आहे. काही पुरवठादारांनी तशी कबुली दिली असून तसे पुरावेही प्राप्त झाल्याचा दावा बरगे यांनी केला आहे.
राज्यभराचा आढावा घेतला असता साधारण गेल्या काही महिन्यात साधारण दहा कोटी रुपयांची कामे बाहेरून करण्यात आली. स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात सामान खरेदी करण्यात आली आहे. त्यातील पाच ते दहा टक्के इतकी रक्कम कमिशन म्हणून संबंधित विभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांना मिळाले असून गेली अनेक वर्षे स्थानिक पातळीवर कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा अंदाज अंदाज बरगे यांनी व्यक्त केला आहे.
एसटी महामंडळाचे राज्यभरात ३१ विभाग आहेत. प्रत्येक विभागात विभागीय कार्यशाळा असून, तेथे बस दुरुस्तीसाठी कुशल कर्मचारीवर्ग कार्यरत आहेत. एसटीच्या बसच्या दुरुस्त्या या स्थानिक वोर्कशॉपमध्ये होत नसेल तर मध्यवर्ती कार्यशाळेत या दुरुस्त्या करणे क्रमप्राप्त आहे. तिथे देखील न झाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीने पुढील कार्यवाही करावी लागते. सर्व नियम धाब्यावर बसवून थेट बाह्य संस्थांकडून सर्व दुरुस्त्या करून घेतल्या आहेत. त्याचप्रमाणे नियम व निकष डावलून खरेदी करण्यात आली आहे. काही बनावट कोटेशन व बनावट संस्थांकडून खरेदी करण्यात आली असल्याचेही बरगे यांनी स्पष्ट केले आहे.
काही विभागातील खरेदी व बाह्य संस्थेकडून केलेल्या कामाचा आढावा घेतल्यास एकाच संस्थेकडून तीन बनावट कोटेशन मागवले जात आहे. मूळ कोटेशन तुलनेत दोन कोटेशनमध्ये दर वाढवून दाखवले गेले आहेत. परिणामी, स्थानिक वर्कशॉपमध्ये होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत या कामांना अनावश्यक जास्त दर आकारले गेले. काही विभागात यंत्र अभियंत्याच्या तोंडी आदेशावर बस थेट पाठवून दुरुस्ती केली जात असून असे प्रकार वारंवार घडले. या व्यवहारात यंत्र अभियंता चालन व अनेक भांडार शाखेतील अधिकारी आदींचा समावेश असल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा : मुंबई महानगर प्रदेशातील टॅक्सी, रिक्षा ओला, उबर विरोधात तक्रार करणे झाले सोपे
हल्लीच एका भ्रष्टाचारी अधिकाऱ्याच्या बडतर्फीची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली असून विभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या मर्जीप्रमाणे केलेल्या खरेदीची तपासणी केली तर मोठे घबाड बाहेर येईल असेही बरगे यांनी म्हटले आहे.