शहर

‘म’ मराठीचा नव्हे तर मलिदा आणि मतलबाचा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उबाठावर टीकास्त्र

मुंबई :

बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेलो मी प्रामाणिक कार्यकर्ता आहे, मी कोणाला छेडत नाही, पण मला छेडलं तर कोणाला सोडत नाही, असा निर्वाणीचा इशारा शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटाला आज दिला. विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. भरलेल्या ताटाचे विचारता पण जनतेच्या मतांची माती कोणी केली, देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर कोणी खुपसला, असे प्रतिप्रश्न उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी उबाठाला केले.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठी माणूस मराठी भाषा आमचा श्वास आहे आणि हिंदुत्व आमचा प्राण आहे. पालिका निवडणुका जवळ आल्या की मराठीबद्दल, महाराष्ट्राबद्दल आणि मुंबईबद्दल जो काही अपप्रचार होतो तो सगळ्यांना अवगत झालाय. वरुन किर्तन आणि आतून तमाशा, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला. मराठीचं प्रेम आम्हाला शिकवण्याची गरज नाही. जन्मलो मराठी, मराठीसाठीच जगणार आणि मराठीसाठीच खपणार, असे ते म्हणाले.

मराठी माणूस तुमच्या फेक नरेटिव्हला आता फसणार नाही. कारण तुमच्या तोंडी ‘म’ म्हणजे महापालिकेचा, ‘म’ मलिद्याचा, ‘म’ मतलबाचा आणि ‘म’ मतांचा आहे आणि तुमच्या मनात फक्त मतांचे राजकारण आहे, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली. माझ्याकडे बोलण्यासारखं खूप काही आहे, पण जेव्हा ते बोलतात तेव्हा मी बोलतो. आरोपांना आरोपाने नाही तर कामातून उत्तर देणारा कार्यकर्ता आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. फेसबुकवाले सामोरे जाऊ शकत नाही म्हणून सकाळ दुपार व संध्याकाळ माझ्यावर टीका करतात. माझ्यावर टीका करण्यापूर्वी तुमच्याकडे तीन बोटं आहेत त्याचा विचार करा, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला सुनावले.

हेही वाचा :  एसटीच्या स्वतःच्या कार्यशाळा असताना कमिशन मिळण्यासाठी कोट्यवधी रुपयांची दुरुस्ती कामे बाहेरून

ते पुढे म्हणाले की, इतक्या लवकर झटपट रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पाहिला नाही. ज्यांना कस्पटासमान समजले, संपलेले लोक असल्याचे हिणवले मात्र त्यांच्याच मागे रोज जावे लागतंय, चल मेरे भाई तेरे हाथ जोडतां हू, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला. भरलेल्या ताटाचे विचारता पण निकालानंतर जनतेच्या मतांची माती कोणी केली, असा सवाल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विचारला. २०१९ च्या निवडणूक निकालानंतर देवेंद्रजींनी ५० फोन केले ते का नाही उचलले. देवेंद्रजींच्या पाठित खंजीर कोणी खुपसला, असे प्रश्न उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित केले. गुवाहाटीला असताना तुम्ही दिल्लीशी संधान बांधण्याचा प्रयत्न करत होतात. आम्ही सत्ता सोडून गेलो. गद्दारी तुम्ही केली, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

फडवणीसांमुळे शिवसेनेला मुंबईचे महापौर पद

मुंबई महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला मिळालेलं महापौरपद केवळ आपल्या विनंतीमुळे शिवसेनेला बहाल केलं गेलं, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहात केला. या घटनेला आमदार मिलिंद नार्वेकर साक्षीदार आहेत, असे ते म्हणाले. भाजपने महापौरपदाची तयार केली होती, मात्र आपण देवेंद्र यांना विनंती केली की महापौरपद सोडा आणि शिवसेनेला द्या, त्यांनी अर्धा तासांत विचार करुन पत्रकार परिषद घेत महापौरपद शिवसेनेला देऊन टाकलं. मात्र २०१९ मध्ये दगा, धोका आणि विश्वासघात करुन त्याची परतफेड केली, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. एक तू राहशील नाहीतर मी, अशी टोकाची भाषा त्यांनी केली. त्यामुळेच त्यांचा कार्यक्रम करावा लागला, असे ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *