शहर

सफाई कामगारांच्या मागण्या मान्य; सोमवारी करार,  विजयी मेळावा आणि संप मागे

मुंबई :

मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांचे एकही पद कमी केले जाणार नाही. तर कंत्राटी कामगारांना कायम केले जाणार आहे. तसा करारच मनपा आयुक्त कामगार संघटनांबरोबर येत्या सोमवारी करणार आहेत. मनपा सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार मंगळवारी सकाळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांच्यासोबत म्युनिसिपल कामगार ॲक्शन कमिटी आणि मनपा कामगार संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाच्या वाटाघाटी झाल्या.

या बैठकीत समाजवादी कामगार नेते साथी कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरेश ठाकूर, विजय कुलकर्णी, अशोक जाधव, रमाकांत बने, वामन कविस्कर, मिलिंद रानडे, रंगा सातवसे, बाबा कदम, देवी गुजर, प्रकाश जाधव, शेषराव राठोड आणि प्रफुल्लता दळवी सहभागी झाले होते. १७ जुलै रोजी आझाद मैदानावर झालेल्या मनपा सफाई कामगारांच्या मोर्चाची आणि घोषित संपाची दखल घेऊन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ मंत्री श्री. गिरीश महाजन यांना आझाद मैदानात भेटीसाठी पाठवले होते. त्यानंतर विधानभवनात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर कामगारांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक दिशा मिळाली. आजच्या मनपा आयुक्तांसोबतच्या बैठकीत या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

कामगारांच्या मागण्यांमध्ये टेंडर प्रक्रियेमुळे कामगारांच्या हिताला बाधा येऊ न देणे, कंत्राटी कामगारांना कायम करणे, कामगारांची पदे सुरक्षित ठेवणे, लाड-पागे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करणे याचा समावेश होता. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: स्पष्ट आश्वासन दिले होते. येत्या सोमवारी आपण याबाबतचा करार करू, असे आयुक्तांनी कामगार नेत्यांना संगितले. त्यामुळे 23 जुलैपासून प्रस्तावित असलेला संप मागे घेण्यात आला असून सोमवारी विजयी मेळावा घेण्यात येणार असल्याचे, संघर्ष समितीचे समन्वयक वामन कविस्कर यांनी संगितले.

दशकातला सर्वात मोठा विजय

मुंबई सफाई कामगारांचा गेल्या दशकातला हा सर्वात मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया चारही कामगार संघटनांचे नेते अशोक जाधव, रमाकांत बने, कॉ. मिलिंद रानडे आणि बाबा कदम यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आयुक्त भूषण गगराणी आणि समाजवादी कामगार नेते साथी कपिल पाटील यांचे त्यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *