
मुंबई :
राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत कृषी व संलग्न या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीला विज्ञान शाखेतून ५० टक्के गुण असलेली अट शिथिल करण्याचा निर्णय राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार आता खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीला ४५ टक्के गुण मिळाले असल्यास प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र अन्य आरक्षणासाठी असलेल्या गुणांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत ४ जुलै २०२५ पासून राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत कृषी व संलग्न या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. कृषी व संलग्न पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गासाठी इयत्ता बारावीमध्ये विज्ञान शाखेत किमान ५० टक्के गुण बंधनकारक आहेत. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्गीय प्रवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक, दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीला विज्ञान शाखेतून ४० टक्क्यांपेक्षा कमी गुण नसावेत. तसेच राज्य सामाईक प्रवेश परीक्षेमध्ये ० पेक्षा जास्त गुण असणे बंधनकारक होते. मात्र यावर्षी राबविण्यात येणाऱ्या कृषी व संलग्न अभ्यासक्रमांसाठी खुल्या प्रवर्गासाठी असलेली ५० गुणांची अट शिथिल करत ती ४५ टक्के करण्याचा निर्णय राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने घेतला आहे. त्याचप्रमाणे राज्य मंडळातून बारावी अभ्यासक्रमासाठी कृषी विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना १० टक्के अधिक गुण देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. कृषी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी २७ जुलै अंतिम मुदत दिली आहे. त्यामुळे नव्याने पात्र ठरणाऱ्या विद्यार्थांनी या मुदतीत https://cetcell.mahacet.org/cap- 2025-26/ या लिंकद्वारे ऑनलाईन प्रवेश अर्ज दाखल करावा, असे राज्य सामाईक प्रवेश कक्षाकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा : अकरावीच्या तिसऱ्या फेरीमध्ये १ लाख ११ हजार विद्यार्थ्यांना संधी
आठ अभ्यासक्रमांना हा नियम लागू
पदवी प्रवेश माहिती पुस्तिकेत दिलेल्या माहितीनुसार कृषी व संलग्न अभ्यासक्रमातील विविध आठ विद्याशाखांच्या कृषी, उद्यानविद्या, वनशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, कृषी अन्नशास्त्र, सामुदायिक विज्ञान, कृषी जैव तंत्रज्ञान आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापान या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी हा नियम लागू असणार आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांन १० पॉईंटसचा अधिकार देण्यात येणार आहे.
सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना प्रथमच मिळणार १० टक्के गुण
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातून (सीबीएसई) इयत्ता बारावी विज्ञान शाखेतून कृषि (८०८) या विषयासह उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना कृषी अभ्यासक्रमाच्या या आठ विद्याशाखेतील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता १० टक्के अधिक गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनाही आता कृषी अभ्यासक्रमाला अधिक गुण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.