
मुंबई :
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी व आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक राहील. तर हार्बर पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत ब्लॉक असेल.
मध्य रेल्वे मार्गावर मुलुंड स्थानक येथून १०.४३ ते ३.५३ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या /अर्धजलद ट्रेन, मुलुंड ते कल्याण दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली स्थानकांवर थांबतील आणि आपल्या निर्धारित वेळेपेक्षा सुमारे १० मिनिटे उशिरा पोहोचतील.
कल्याण येथून १०.३६ ते ३.५१ पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या/अर्ध जलद ट्रेन, कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवल्या जातील. या ट्रेन्स डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे स्थानकांवर थांबतील आणि मुलुंड स्थानकावर अप धिम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा पोहोचतील.
ठाणे करीता असलेल्या उपनगरी गाड्या निर्धारित डाऊन धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या व तेथे येणाऱ्या सर्व अप व डाऊन धीम्या लोकल सेवा सुमारे १० मिनिटे उशिराने पोहोचतील आणि सुटतील.
हार्बर मार्गावरही ब्लॉक
हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत आणि पनवेल येथे सकाळी ११.०५ ते संध्याकाळी ५.०५ पर्यंत ब्लॉक राहील. पनवेल येथून १०.३३ ते सायंकाळी ५.०७ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०९.४५ ते ३.४४ पर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येतील. पनवेल येथून ११.०२ ते ४.२६ पर्यंत ठाणे कडे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून १०.०१ ते ४.२४ पर्यंत पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील ट्रेन रद्द राहतील. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – वाशी विभागात विशेष लोकल सेवा चालवल्या जातील. तसेच ब्लॉक काळात ठाणे -वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील. तर ब्लॉक काळात पोर्ट मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.
पश्चिम रेल्वेचा वसई रोड यार्डवर रात्रीचा ब्लॉक
ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी शुक्रवार, शनिवारच्या मध्यरात्री वसई रोड यार्डवर सर्व मालगाडी आणि दिवा मार्गांसह सकाळी जंबो ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे रविवार २७ जुलै रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात दिवसभर ब्लॉक राहणार नाही.