
मुंबई :
माघी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या पारंपरिक मंडळांना त्यांच्या मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करण्यासाठी अखेर उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांच्या विनंतीनंतर ही परवानगी देण्यात आली.यामुळे गेल्या वर्षीच्या ‘माघी गणपती’ मूर्तींचे विसर्जन २ ऑगस्ट रोजी केले जाणार आहे अशी माहिती चारकोपचा राजा सार्वजनिक उत्सव ट्रस्टचे मानद अध्यक्ष निखिल गुढेकर यांनी दिली.
मुंबई उच्च न्यायालयाने २४ जुलै २०२५ रोजी दिलेल्या अंतरिम आदेशानुसार, सहा फूटांपेक्षा अधिक उंचीच्या पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) गणेशमूर्तींच्या नैसर्गिक जलस्रोतांतील विसर्जनावर लागू असलेली बंदी शिथिल करत मार्च २०२६ पर्यंत सशर्त परवानगी दिली आहे. यामुळे अनेक मंडळांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या वर्षी ‘चारकोपचा राजा’,कार्टर रोडचा राजा,’ आणि ‘कांदिवली श्री’ या प्रमुख मंडळांनी ‘माघी गणपती’ उपक्रमांतर्गत पीओपी मूर्तींची स्थापना केली होती. मात्र त्यावेळी न्यायालयीन बंदीमुळे मूर्तींचे विसर्जन करता आले नव्हते. आता न्यायालयाने परवानगी दिल्यामुळे या मंडळांनी येत्या २ ऑगस्ट २०२५ रोजी कांदिवली पश्चिम येथील डहाणूकरवाडी तलावात विसर्जन करण्याचे नियोजन केले असून, न्यायालयाने यासाठी अधिकृत परवानगी दिली आहे.
हेही वाचा : ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान लोकल थांबे रद्द
सदर तलाव महापालिकेच्या आर-दक्षिण विभागाच्या हद्दीत येतो. समितीने संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची मागणी केली होती. महापालिकेने सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे मंडळांचे मूर्ती विसर्जन आता पारंपरिक पद्धतीने होणार आहे. गणेशभक्त आणि स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, माघी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही परवानगी महत्त्वाची मानली जात आहे.