शहर

एसटीमधील पाच हजार चालक, वाहक दहा वर्षे हंगामी वेतन श्रेणीवर

चालक, वाहकांची आर्थिक पिळवणूक थांबण्यात यावी – महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

मुंबई :

राज्य परिवहन महामंडळात चालक तथा वाहक हे पद नव्याने निर्माण करण्यात आल्याने व या पदातील कर्मचाऱ्यांना चालकाच्या मंजुरीत समाविष्ट करण्यात आल्याने चालक पदात अतिरिक्त कर्मचारी झाले आहेत, परिणामी चालक व वाहक या दोन्ही पदातील ५००० कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसला असून मंजुरी अभावी त्यांना चक्क दहा वर्षे हंगामी वेतन श्रेणीत काम करावे लागत असल्याने त्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे.

या संदर्भात एक निवेदन परिवहन मंत्री व एसटीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना देण्यात आले असून चालक व वाहक या पदातील कर्मचाऱ्यांची पदे वेगवेगळी न दाखवता दोन्ही पदांचे एकत्रीकरण करण्यात आल्यास हा प्रश्न सुटू शकेल असेही संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

एसटीच्या स्थापनेपासून चालक व वाहक या पदासाठी वेगवेगळी भरती केली जात असून सन २०१६ मध्ये “वाहक” हे पद गोठविण्यात आले असून चालक तथा वाहक हे एकत्रित पद निर्माण करण्यात आले आहे. हे नवीन पद निर्माण करण्यात आल्यानंतर ते चालकाच्या मंजुरीत समाविष्ट करण्यात आल्याने त्याचा फटका ५००० चालक व वाहक कर्मचाऱ्यांना बसला आहे. चालकाच्या मंजुरीत वाहक समाविष्ट करण्यात आल्याने चालक पदात अतिरिक्त कर्मचारी झाले असून चालक व वाहक या दोन्ही पदाचे एकत्रीकरण करण्यात आल्यास हा प्रश्न सुटू शकेल असेही बरगे यांनी निवेदनात म्हटले आहे.

एसटीमधील बढती मिळण्यात अन्याय

हंगामी वेतन श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे नाव ज्येष्ठता सुचित सुद्धा खाली टाकले जाते व बढती परीक्षेस तीन वर्षे पूर्ण झाल्यावर पात्र ठरविण्यात येते. त्यामुळे त्यांच्यापेक्षा कनिष्ठ कर्मचारी बढती परीक्षेस पात्र ठरतात. बढती उशिरा मिळाल्याने सुद्धा त्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचेही बरगे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : अकरावीच्या तिसऱ्या फेऱ्यानंतही पाच लाख विद्यार्थी प्रवेशापासून वंचित

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *