
मुंबई :
राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रियेतील चौथी यादी गुरुवार, ३१ जुलै रोजी जाहीर होणार असून, त्याच दिवसापासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.
चौथ्या फेरीसाठी नोंदणी करण्यासाठी २९ जुलै अंतिम मुदत देण्यात आली होती. त्यानुसार चौथ्या फेरीसाठी ७ हजार ५१ विद्यार्थ्यांनी नवीन नोंदणी केली आहे. तसेच नियमित फेरीसाठी ३ लाख ७२ हजार ६५२ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरला तर, कोट्यांतर्गत १३ हजार ८२९ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरला. या चौथ्या यादीत प्रवेशाची संधी मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना ३१ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान आपला प्रवेश संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन निश्चित करावा लागेल.
हेही वाचा : एसटीमधील पाच हजार चालक, वाहक दहा वर्षे हंगामी वेतन श्रेणीवर
सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी सुरू असलेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या तीन नियमित फेर्यांत आतापर्यंत ८,११,७३१ विद्यार्थ्यांचा प्रवेश कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये निश्चित झाला आहे. एकूण १४.३२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून चौथ्या फेरीसाठीही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत आहे. दरम्यान, सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी आणि उच्च माध्यमिक शाळांनी ११ ऑगस्टपूर्वी वर्ग सुरू करावेत, अशा स्पष्ट सूचना शासनाने यापूर्वीच दिल्या आहेत.