आरोग्य

Education : वैद्यकीय प्रवेशासाठी यंदा निर्णायक संघर्ष, एमबीबीए, बीडीएस जागांसाठी चुरस, ६० हजारावर यंदा अर्ज

एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची अंतरिम यादी २ ऑगस्टला जाहीर करण्यात येणार असून यानंतर पहिली निवड यादी ७ ऑगस्टला जाहीर होणार

मुंबई :

नीटच्या गुणावर प्रवेश होत असलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागा राज्यात सुमारे २८ हजारावर असल्या तरी यामध्ये एमबीबीएस आणि बीडीएस टॉप महाविद्यालयातील वैद्यकीय आणि दंत अभ्यासक्रमांच्या असलेल्या सुमारे १० हजार जागा पटकवण्यासाठी यंदाही नीट पात्रधारकांच्या गुणवत्तेचा कस लागणार आहे. टॉप लिस्ट वर असलेल्या शासकीय महाविद्यालयात (Education) प्रवेशासाठी यंदाही निर्णायक संघर्ष असणार आहे. एमबीबीएस, बीडीएस या सह अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बुधवारी सायंकाळपर्यंत ५९ हजारावर अर्ज आले असून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रे अपलोड आणि शुल्क भरण्याची गुरुवार शेवटचा दिवस असणार आहे. या नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची अंतरिम यादी २ ऑगस्टला जाहीर करण्यात येणार असून यानंतर पहिली निवड यादी ७ ऑगस्टला जाहीर होणार आहे.

नीट यूजी २०२५ परीक्षेचा निकालानंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने राज्य कोट्याअंतर्गत एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीएनवायएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी या अभ्यासक्रमासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली या कालावधीत तब्बल ५९ हजार विद्यार्थ्यांनी बुधवार सायंकाळपर्यंत अर्ज केले आहेत.

गेल्यावर्षी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी नीट यूजी परीक्षेचा कटऑफ कमालीचा वाढला होता. टॉप २५ शासकीय आणि अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी नीट परीक्षेत किमान ६५० ते ६९० गुण असलेल्या विद्यार्थ्यांनाच स्थान मिळाले होते. मुंबईच्या केईएम मध्ये खुल्या कोट्यातून एमबीबीएस प्रवेश घेतलेल्या शेवटच्या विद्यार्थ्याचा स्कोअर तब्बल ६९० वर पोहचला होता, याच महाविद्यालयात प्रथम क्रमांकाने प्रवेश मिळवलेला विद्यार्थी ७०५ गुण मिळवलेला होता. पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील शेवटच्या विद्यार्थ्यांचा कटऑफ ६८५, तर मुंबईच्या ग्रँट मेडिकल महाविद्यालयाचा ६७५ होता. सायन येथील लोकमान्य टिळक मेडिकल महाविद्यालयाचा कटऑफही ६७५ इतका गेला होता. केवळ मुंबई आणि पुणेच नव्हे, तर नागपूर, ठाणे, कोल्हापूर, मिरज, सोलापूर, सातारा, जळगाव, बारामती यांसारख्या महाविद्यालयांमध्येही खुल्या गटातून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा कटऑफ ६४० पेक्षा खाली गेला नव्हता.

नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शेवटचा कटऑफ ६७० होता, तर इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील ६४१ गुणावर पोहचला होता. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, अकोला, अलिबाग, गोंदिया, अमरावती या तुलनात्मकदृष्ट्या नव्याने स्थापन झालेल्या महाविद्यालयांमध्येही खुल्या गटातून ६४० गुणापर्यंत होता. केवळ एमबीबीएसच नव्हे, तर बीडीएस अभ्यासक्रमासाठीसुद्धा चुरस मोठी पहायला मिळाली होती.

मुंबईतील शासकीय दंत महाविद्यालयात खुल्या गटातील कटऑफ ५८९ गुणांचा होता. नायर मध्येही ५८७ गुण, तर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील महाविद्यालयातील अनुक्रमे ५८७ आणि ५८१ इतके कटऑफ असल्याचे पहायला मिळाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील जागा मर्यादित असल्यामुळे आणि खासगी महाविद्यालयांचे शुल्क यामुळे ६५० च्या खाली स्कोअर असलेल्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जागा मिळवणे अशक्य झाले.
यंदा ६० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यापैकी किती अर्जदार वैद्यकीय आणि दंत अभ्यासक्रमाचे पसंतीक्रम भरतात यावर यंदाची प्रवेशाची स्पर्धा कळणार आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रम असलेल्या राज्यातील विविध महाविद्यायात सर्वाधिक जागा आयुर्वेद पदवी (बीएएमएस) अभ्यासक्रमासाठी असून एकूण ९ हजार ७३१ जागा उपलब्ध आहेत. त्यानंतर बीएचएमएस होमिओपॅथी अभ्यासक्रमासाठी ४ हजार ४१७, बीपीटीएच फिजिओथेरपीसाठी ५ हजार १९५ आणि सर्वाधिक मागणी असलेल्या एमबीबीएससाठी एकूण ८ हजार १४१ जागा आहेत. यात ३६ शासकीय महाविद्यालयांत ४ हजार १५७ जागा असून, ५ अनुदानित संस्थांमध्ये ७६४ आणि २३ खासगी संस्थांमध्ये ३ हजार २२० जागा आहेत. तर दुसरीकडे आणखी मागणी असलेल्या बीडीएस (दंतशास्त्र) अभ्यासक्रमासाठी एकूण २ हजार ६७५ जागा असून यातील बहुतांश जागा खासगी महाविद्यालयांत आहेत. केवळ अंतिम नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची यादी २ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार असून, त्यातील एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमाची अंतरिम यादी आणि जागांचा तपशील २ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. यानंतर पसंतीक्रम व निवड यादी व प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे, अशी माहिती सीईटी कक्षाकडून देण्यात आली

एमबीबीएस
टॉप महाविद्यालये ( गतवर्षीचा नीट गुण कटऑफ)

सेठ जी.एस. वैद्यकीय महाविद्यालय (केईएम), मुंबई – कटऑफ: ६९०
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे – ६८५
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर – ६७०
ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई – ६७५
लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय, सायन – ६७५
कूपर हॉस्पिटल, मुंबई – ६७५
डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, पुणे (खासगी) – ६३५
राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, ठाणे – ६७०
नायर वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई – ६४६
भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय, पुणे (खासगी) – ६२०

बीडीएस
टॉप महाविद्यालये (गतवर्षीचा नीट गुण कटऑफ)
शासकीय दंत महाविद्यालय, मुंबई – ५८९
नायर दंत महाविद्यालय, मुंबई – ५८७
शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर – ५८७
भारती विद्यापीठ दंत महाविद्यालय, पुणे (खासगी) – ५८०
शासकीय दंत महाविद्यालय, छ. संभाजीनगर – ५८१
डॉ. डी. वाय. पाटील दंत महाविद्यालय, पुणे (खासगी) – ५७६
शासकीय दंत महाविद्यालय, कोल्हापूर – ५७९
शासकीय दंत महाविद्यालय, लातूर – ५७८
सिंहगड दंत महाविद्यालय, पुणे (खासगी) – ५७४
शासकीय दंत महाविद्यालय, यवतमाळ – ५७३

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *