मनोरंजन

फकिरीयत चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

श्री महावतार बाबाजींची महती सांगणारा चित्रपट १९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार

मुंबई : 

साधूसंतांनी नेहमीच सर्वसामान्यांना मार्ग दाखवत सुखी जीवनाचा मंत्र सांगितला आहे. असेच एक युगपुरुष, एक महापुरुष हजारो वर्षांपासून या सृष्टीच्या कल्याणाचे कार्य करीत आहेत. हजारो वर्षांपासून हिमालयाच्या पावन धरतीवर संचार करीत आहेत, असे श्री महावतार बाबाजी यांनी दिलेला योग मानवांसाठी एक दैवी भेट ठरला आहे. हा योग म्हणजेच क्रियायोग… बाबाजींनी सांगितलेल्या क्रिया योगाचा अवलंब करून अतिशय कमी काळात मानव आपली उत्क्रांती करू शकतो, अध्यात्मिक मार्गाने पुढे जाऊ शकतो, आयुष्याचं कल्याण करू शकतो. योगाचे प्रणेते श्री महावतार बाबाजी, या रहस्यमय हिमालयीन योग्याची भेट ‘फकिरीयत’ या आगामी हिंदी चित्रपटात होणार आहे. १९ सप्टेंबर रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होइल. या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘फकिरीयत’ चित्रपटाची निर्मिती भद्रबाहू डिव्हाइन क्रिएशन्स एलएलपीच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. आजवर बऱ्याच मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक संतोष मांजरेकर यांनी ‘फकिरीयत’ चे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची कथा ‘चिरुट जलती है’ आणि ‘अध्यात्म एक विद्रोह, एक क्रांती’ या अनुजा जानवलेकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांवर आधारलेली आहे. पटकथालेखन अनिल पवार यांनी केले असून, पवार यांनीच अनुजा जानवलेकर यांच्यासोबत संवादलेखनही केले आहे. प्रदर्शित करण्यात आलेल्या टिझरमध्ये बाबाजींच्या कार्याची झलक पाहायला मिळते. बाबांची शिकवण, त्यांचे विचार, त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांची अनुभूती ‘फकिरीयत’ चित्रपट पाहिल्यावर येणार असून, त्याचीच अचूक झलक टिझरमध्ये पाहायला मिळते. हि केवळ बाबाजींच्या महतीची आध्यात्मिक वाटचाल नसून, त्यांच्या शिष्येला द्याव्या लागलेल्या संघर्षाची गाथाही आहे. सनातन धर्माचा प्रसार करणाऱ्या आपल्या शिष्येच्या वाटेत येणारे अडथळे दूर करण्याची शक्ती बाबाजी देतात. महाकालीसोबतच महादेवांचेही दर्शन टिझरमध्ये होते. ‘गुरू और शिष्य की कहानी’ ही ‘फकिरीयत’ला दिलेली टॅगलाईन अतिशय समर्पक आहे.

‘फकिरीयत’च्या टिझरमध्ये चित्रपटाची अचूक झलक

‘फकिरीयत’च्या टिझरबाबत दिग्दर्शक संतोष मांजरेकर म्हणाले की, ‘फकिरीयत’च्या टिझरमध्ये चित्रपटात काय आहे याची अचूक झलक पाहायला मिळते. हा आध्यात्मिक चित्रपट जगाच्या हितासाठी स्वत: चंदनाप्रमाणे झिजून इतरांना मार्ग दाखविणाऱ्या अनेक अवलीयांची महती सांगणारा आहे. बाबाजींच्या शिष्येच्या गोष्टीच्या माध्यमातून त्यांचे विचार सर्वदूर पोहोचविण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. टिझर प्रेक्षकांना आवडेल आणि ‘फकिरीयत’ पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करतील अशी आशाही संतोष मांजरेकर यांनी व्यक्त केली आहे.

मुख्य भूमिकेतील मराठमोळ्या दीपा परबने ‘फकिरीयत’च्या निमित्ताने हिंदी चित्रपटात पुनरागमन केले आहे. या चित्रपटात उदय टिकेकर, संदेश जाधव, विनीत शर्मा, अक्षय वर्तक, नयन जाधव, संदेश जाधव, अनिशा सबनीस आदी कलाकार आहेत. संतोष जुवेकर पाहुण्या भूमिकेत आहे. डिओपी अजित रेड्डी यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. गीतकार समृद्धी पवार यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार प्रवीण कुंवर यांनी संगीतसाज, तर मनीष राजगिरे, मनोज मिश्रा, जसराज जोशी, नेहा राजपाल यांनी स्वरसाज चढवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *