
मुंबई :
मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या एमएमएस (मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज्) आणि एमसीए (मास्टर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन) या दोन वर्षीय अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश परीक्षा रविवार दिनांक ०३ ऑगस्ट २०२५ रोजी ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी २ ऑगस्ट रोजी ऑनलाईन पध्दतीने मॉक टेस्टचे आयोजनही करण्यात आले आहे. या ऑनलाईन प्रवेश परीक्षेचा तपशील (लिंक आणि लॉगिन क्रेंडेंशिअल्स ) विद्यार्थ्यांना त्यांच्या ईमेलवर पाठविण्यात आले आहे. एमसीए अभ्यासक्रमासाठी ६७० आणि एमएमएस अभ्यासक्रमासाठी २१७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एमएमएस ऑनलाईन प्रवेश परीक्षा सकाळी ११ ते १२.३० या दीड तासाच्या कालावधीत आयोजित केली जाणार, तर एमसीए ही ऑनलाईन प्रवेश परीक्षा दुपारी २ ते ३ ते या एक तासाच्या कालावधीत आयोजित केली जाणार आहे. या दोन्ही परीक्षा बहूपर्यायी प्रश्न पद्धतीने प्रत्येकी १०० गुणांच्या असणार आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून एआयसीटीई व युजीसीने सीडीओईच्या माध्यमातून मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एमएमएस) या अभ्यासक्रमासाठी परवानगी दिली असून हा अभ्यासक्रम एमबीए या अभ्यासक्रमाच्या समकक्ष आहे. एचआर, फायनान्स व मार्केटिंग या तीन विषयात एमएमएस हा अभ्यासक्रम करता येतो. एमसीए (मास्टर ऑफ कम्प्युटर एप्लिकेशन) हा दोन वर्षाचा सुधारित अभ्यासक्रम आहे. या दोन्ही ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या ईमेलला पाठविण्यात आलेल्या लिंक आणि लॉगिन क्रेडेंशिअल्स नुसार मॉक टेस्ट आणि प्रवेश परीक्षा द्यायची असल्याचे संचालक प्रा. शिवाजी सरगर यांनी सांगितले.