
मुंबई :
डॉक्टर इंजिनिअर होण्यासाठी सगळेच धावत सुटले असून, विद्यार्थ्यांनी आता संशोधनाकडे वळावं असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारणी निमंत्रित सदस्य व मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केले.
विद्यार्थ्यांना विज्ञान विषयात गोडी निर्माण व्हावी तसेच वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी प्रेरणा मिळावी, यासाठी भांडुपमधील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाय या संस्थेने आयोजित केलेल्या क्वेस्ट-25 विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन अनिल बोरनारे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यार्थ्यांना हा सल्ला दिला. यावेळी संस्थेचे कमलाकर इंदुलकर, संस्थेचे माजी विद्यार्थी तसेच विविध शाळांमधील विद्यार्थी उपस्थित होते.
पर्यावरण पूरक गणेशोत्सव, प्लास्टिक मुळे होणारी हानी, पवनचक्की, फास्ट फूड, शरीराला हानिकारक असलेले शीतपेय, चेहऱ्याला हानिकारक असलेले सौंदर्य प्रसाधने यासह अनेक विषयावरती विद्यार्थ्यांनी स्टॉलची मांडणी केली होती. देश विदेशातील वैज्ञानिक तसेच त्यांनी केलेले संशोधनात्मक कार्य याची माहिती देणारे चित्रफलक या प्रदर्शनामध्ये लावण्यात आले होते. यासोबतच पर्यावरणासंदर्भातील पुस्तकांचं प्रदर्शन देखील यामध्ये आहे.
हेही वाचा : राज्यात ‘हर घर तिरंगा’ अभियानाची उद्यापासून सुरूवात
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी शिक्षणाय ही संस्था कार्य करीत असून आतापर्यंत गिर्यारोहण व्यक्तिमत्व विकास महाराष्ट्रातील किल्ल्यांना भेटी अप्रगत विद्यार्थ्यांसाठी उपक्रम तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणीव निर्माण व्हाव्यात यासाठी दरवर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करीत असते. याचा लाभ भांडुपमधील अनेक शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी घेत असतात.