
मुंबई :
एसएनडीटी महिला विद्यापीठाने सामाजिक बांधिलकीचे अनोखे उदाहरण सादर करत आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग तसेच समाजकार्य विभागाच्या माध्यमातून ‘संस्कृता बंध’ हा सामाजिक उपक्रम राबवला. या उपक्रमाअंतर्गत भारताच्या सीमावर्ती फिरोजपूर येथे तैनात असलेल्या शूर सैनिकांना सात हजार राख्या पाठवण्यात आल्या.
‘विद्येचा अभिमान – रक्षकांचा सन्मान’ या संकल्पनेवर आधारित असलेला हा उपक्रम विद्यापीठाच्या राष्ट्रीय कर्तव्यभावना व सामाजिक उत्तरदायित्वाचे प्रतीक ठरला आहे. या उपक्रमाच्या आयोजनप्रसंगी कुलगुरू प्रा. डॉ. उज्वला चक्रदेव, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखा अधिकारी विकास देसाई, चर्चगेट आंतरसंकुल प्रमुख डॉ. संजय फड आणि आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर चव्हाण यांची उपस्थिती लाभली.
या उपक्रमात विद्यापीठातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, कर्मचारी संघटना, विविध विभागांचे प्रतिनिधी आणि विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. या उपक्रमामार्फत भारतीय जवानांच्या सेवेचा सन्मान तर झाला, शिवाय विद्यापीठाच्या विद्यार्थिनींमध्ये देशभक्तीची भावना आणि सामाजिक जाणीव अधिक बळकट झाली.