आरोग्य

हाफकिनच्या तत्परतेमुळे तीन वर्षांच्या बाळाला मिळाले विंचूदंशावरील इंजेक्शन

मुंबई :

तीन वर्षांच्या मुलाला विंचूदंश झाला म्हणून त्यावरील औषधासाठी हाफकिन संस्थेच्या आवारात आलेल्या एका पित्याला हाफकिन संस्था व हाफकिन महामंडळाने तत्परतेने आपत्कालीन साठ्यातील इंजेक्शन उपलब्ध करून दिले. त्यामुळे या बाळाला वेळेवर उपचार मिळणे शक्य झाले. सध्या या बाळावर नायर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती उत्तम आहे.

वैतरणा येथे राहणारे पुंडलिक पाटील यांचा तीन वर्षांचा मुलगा सार्थी पाटील याला सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास विंचवाने डंख मारला. त्याला तेथील स्थानिक डॉक्टरांकडे दाखविल्यानंतर त्यांनी त्याला मुंबईमध्ये उपचारासाठी नेण्यास सांगितले. त्यानुसार पुंडलिक पाटील यांनी मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात धाव घेतली. मंगळवारी सकाळी ७ वाजता त्याला नायर रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याची तपासणी करून त्याला बालकांच्या अतिदक्षता विभागात तातडीने दाखल करून घेत उपचार सुरू केले. त्याला विंचूदंशावरील इंजेक्शन देणे आवश्यक होते. या इंजेक्शनची कोणत्याही औषधाच्या दुकानात विक्री होत नसल्याने डॉक्टरांनी पुंडलिक पाटील यांना परळ येथील हाफकिन संस्थेमधून इंजेक्शन आणण्यास सांगितले. पाटील यांनी तातडीने हाफकिन संस्थेच्या दिशेने धाव घेतली. हाफकिन संस्था नेमकी कोठे आहे, याची कल्पना नसल्याने ते लोकांना विचारत दुपारी १२ वाजताच्या सुमारास हाफकिन संस्थेमध्ये पोहोचले. हाफकिन संस्थेच्या प्रवेशद्वारावरच त्यांना कोणाला भेटायचे आहे याची विचारणा केली असता त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना सविस्तर माहिती दिली. त्यानंतर हाफकिन संस्थेमधील कर्मचाऱ्यांनी ही बाब हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. महामंडळातील अधिकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत डॉक्टरांची चिठ्ठी पाहून त्यांच्याकडे असलेल्या आपत्कालीन साठ्यातील सात इंजेक्शन तातडीने पुंडलिक पाटील यांना उपलब्ध करून दिले. हे इंजेक्शन घेऊन १ वाजताच्या सुमारास पाटील हे नायर रुग्णालयाच्या दिशेने निघाले. त्यानंतर सार्थीला इंजेक्शन दिल्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी दिली.

मुंबईमध्ये श्वानदंश व सर्पदंशाच्या घटना घडत असल्याने रुग्णालयामध्ये या दोन्ही संदर्भातील इंजेक्शन उपलब्ध असतात. पण विंचूदंशाच्या घटना घडत नसल्याने या इंजेक्शनचा साठा उपलब्ध नव्हता. त्यामुळे पुंडलिक यांना हाफकिनमधून इंजेक्शन आणण्यास सांगितले. या इंजेक्शनमुळे बाळाच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.
– डॉ. शैलेश मोहिते, अधिष्ठाता, नायर रुग्णालय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *