मनोरंजन

‘आदिशेष’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण

मुंबई : 

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रमेश मोरे नेहमीच आपल्या मातीतील, सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे, मनाला भिडणारे आणि मनोरंजनातून प्रबोधन करणारे विषय आपल्या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांसमोर सादर करीत असतात. मागील बऱ्याच दिवसांपासून ते आपल्या आगामी मराठी चित्रपटाच्या कामात बिझी आहेत. सध्या ते ‘आदिशेष’ या आगामी मराठी चित्रपटावर काम करीत आहेत. ‘आदिशेष’ हे चित्रपटाचे शीर्षक उत्कंठावर्धक असून, त्यात मांडलेला विषय आजवर कधीही समोर आलेला नाही. या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे.

अष्टमी एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली निर्माते प्राध्यापक दत्तात्रय सांगोरे यांनी ‘आदिशेष’ची निर्मिती केली आहे. पहिलीच निर्मिती असलेल्या प्राध्यापक दत्तात्रय सांगोरे यांनी ‘आदिशेष’द्वारे निर्मितीक्षेत्रात पदार्पण केले आहे. दिग्दर्शनासोबतच कथा, पटकथा, संवाद व गीतलेखन रमेश मोरे यांनीच केले आहे. दिग्दर्शक रमेश मोरे यांनी आजवर लेखक-दिग्दर्शकाच्या रूपात १९ चित्रपट बनवले असून, तीन चित्रपटांची निर्मितीही केली आहे. २००४ मध्ये ‘अकल्पित’ या चित्रपटापासून लेखक-दिग्दर्शक म्हणून सुरू झालेला मोरे यांचा प्रवास आज ‘साथ सोबत’ या चित्रपटापर्यंत येऊन पोहोचला आहे. मोरे यांच्या चित्रपटांनी देश-विदेशांमधील विविध चित्रपट महोत्सवांमध्ये आपला ठसा उमटवत बरेच पुरस्कारही आपल्या नावे केले आहेत. त्यांच्या ‘चॅम्पियन्स’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट बालकलाकार हे दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. ‘आदिशेष’मध्ये त्यांनी पुन्हा एकदा एक वेगळा विषय मांडण्याचे आव्हान स्वीकारले असून, दिग्गज कलाकारांच्या साथीने हा चित्रपट पूर्णही केला आहे. आज विकासाच्या नावाखाली काँक्रीटीकरणाला जणू उत आला आहे. शहरांमागोमाग आता गावेही काँक्रीटीकरणाच्या विळख्यात अडकत चालली आहेत. त्यामुळे जणू निसर्गाचा जिवंतपणाच हरवत चालला आहे. माणूस, नाती, राहणीमान सारं काही व्यावहारीक बनले आहे. परंपराही फॅशनसारख्या पाळल्या जाऊ लागल्या आहेत. ‘आदिशेष’ हा चित्रपट याच सर्व गोष्टींवर तिरकस भाष्य करतो आणि समाजाला आरसा दाखवण्याचे काम करतो. आजच्या काळातील एक अतिशय महत्त्वपूर्ण विषय कोकणच्या निसर्गरम्य भूमीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत मनोरंजकरीत्या सादर करण्याचे शिवधनुष्य रमेश मोरे यांनी पुन्हा एकदा यशस्वीपणे पेलले आहे. या चित्रपटाचा विषय आजच्या समाजाला नवी दिशा देणारा ठरेल असे म्हटले तर त्यात काही वावगे ठरणार नाही. कोकणातील संगमेश्वरमधील कडवाई, तुरळ, हारेकर वाडी या ठिकाणी ‘आदिशेष’चे चित्रीकरण करण्यात आले.

हेही वाचा : सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्राकडे जगातील सर्वोत्तम यंत्रणा व तंत्रज्ञान

या चित्रपटात अरुण नलावडे, प्रणव रावराणे, आराधना देशपांडे, वैशाली भोसले, सुचित जाधव, सुरेश वाडिले आदी कलाकार आहेत. सिनेमॅटोग्राफी राजा फडतरे यांनी केली असून, संगीत आणि पार्श्वसंगीत अमेय नरे आणि साजन पटेल यांनी दिले आहे. संकलन अभिषेक म्हसकर यांचे असून वेशभूषा यशश्री मोरे, तर रंगभूषा सतिश भावसार यांनी केली आहे. ध्वनी अरुण चेन्नवार यांची असून, केशभूषा रसिका गुरव यांची आहे. धीरज सांगोरे या चित्रपटाचे निर्मिती प्रबंधक असून, यशश्री मोरे कार्यकारी निर्मात्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *