शहर

नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी शौचालयांची ३० वर्षांची करार पद्धत रद्द करा – मंगलप्रभात लोढा

जनता दरबारात शौचालयांच्या बाबतीत नागरिकांच्या अनेक तक्रारी

मुंबई :

शौचालयांच्या कंत्राटासाठी मुंबई महापालिकेचा ३० वर्षांचा करार अतिशय जाचक असून नागरिकांना त्यामुळे सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. हे करार रद्द करून नव्याने प्रक्रिया राबवावी अशी सूचना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता तथा मुंबई उपनगर सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. यासंदर्भात लोढा यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना पत्रही लिहले आहे. पालिकेच्या एफ \नॉर्थ विभागात आयोजित केलेल्या जनता दरबारात अनेक नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. या वेळी आमदार प्रसाद लाड आणि कॅप्टन तमीळ सेल्वन उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी थेट जनतेशी संवाद साधावा अशा सूचना मंत्रिमंडळातील सदस्यांना केल्या आहेत. त्यानुसार मंत्री मंगलप्रभात लोढा यांचाकडून नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी विभागवार जनता दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. याअनुषंगाने सायन कोळीवाडा मतदार संघातील एफ /उत्तर विभागात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात नागरिकांनी शौचालयांच्या बाबतीत अनेक अडचणींचा पाढा वाचला. शौचालयांचा तीस वर्षांचा करार असल्याने कंत्राटदार मनमानी पद्धतीने शौचालये चालवत असून कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नसल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा : मुंबई-गोवा महामार्गाची कामे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीने करावीत – उपमुख्यमंत्री अजित पवार

अनेक ठिकाणी गळके छत, अस्वच्छ शौचालये , नादुरुस्त दरवाजे तसेच दिव्यांचीही सोय नसल्याचे नागरिकांनी सांगितले. या अडचणीची मंत्री लोढा यांनी तातडीने दखल घेतली. तसेच यासंदर्भात त्यांनी उपस्थित महापालिकेचे सहायक आयुक्त अरुण क्षीरसागर यांना या संबंधी त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले.

तीनशे नागरिकांनी सहभाग घेतला

सायन -कोळीवाडा मतदार संघात असलेल्या एफ /उत्तर या विभागात आयोजित करण्यात आलेल्या या जनता दरबारात ऑनलाईन आणि ऑफलाईन मिळून सुमारे तीनशे नागरिकांनी सहभाग घेतला. नागरिकांना एकाच छताखाली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधता आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. गणेशोत्सवादरम्यान रस्ते दुरुस्ती ,पाणी पुरवठा, वीज पुरवठा आणि स्वच्छतेसंदर्भात त्वरित कारवाई करण्याचे निर्देशही मंत्री लोढा यांनी वरिष्ठ महापालिका अधिकाऱ्यांना दिले. यावेळी आमदार श्री. तामिळ सेल्वन यांनीही त्यांच्या मतदार संघात जनता दरबार आयोजित केल्याबद्दल मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *