
मुंबई :
मुंबईकरांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी शासन सातत्याने काम करीत आहे. आजचा चावी वितरण कार्यक्रमाने शासनाच्या या कार्यपद्धतीवर एकप्रकारे मोहर उमटविली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. बीडीडी चाळवासियांना पुनर्विकासातून साकारलेल्या ५५६ सदनिकांचे वितरण ही मुंबईकरांच्या हक्काच्या घरांच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर येथे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्यावतीने आयोजित ५५६ पुनर्वसन सदनिका वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस संबोधित करताना बोलत होते.
बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा दीर्घकाळाचा अडथळा शासनाने दूर करत सामान्य मुंबईकरांना त्यांच्या हक्काचे घर देण्याच्या दिशेने पाऊले टाकली असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आजवर २० ते २५ वर्षांपासून विविध कारणांनी हा प्रकल्प रखडला होता. शासनाने या प्रकल्पात विकासक न नेमता, थेट म्हाडा मार्फत हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला. जागतिक निविदा काढून काम हाती घेण्यात आले. जागेचा सर्वोत्तम वापर, सौर ऊर्जा, पावसाच्या पाण्याचा निचरा, कचरा व्यवस्थापन अशा आधुनिक सुविधा यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पाचे भूमिपूजन झाल्यानंतरही अनेक अडचणी आल्या. मात्र सर्वांच्या सहकाऱ्याने अडचणी दूर झाल्या. आता पहिल्या टप्प्यात सुमारे ५५६ कुटुंबांना चाव्या देण्यात येत आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दुसरा व डिसेंबरमध्ये तिसरा टप्पा पूर्ण होणार असून, वरळी येथील सर्व बीडीडी चाळ वासियांना घर मिळणार आहेत. पोलिसांना घराचा दर ५० लाखांवरून केवळ १५ लाख रुपये ठरवला आहे. त्यामुळे पोलिसांनाही हक्काचे घर मिळणार आहे. अभ्युदयनगर, जीटीबी नगर यांच्यासह इतर जुन्या वसाहतींचाही पुनर्विकास सुरू आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
धारावी ‘नवीन शहर’ म्हणून उभारणार
धारावी पुनर्विकासालाही गती मिळाली असून १० लाखांहून अधिक लोकसंख्येचा हा परिसर एक ‘नवीन शहर’ म्हणून उभारला जाणार आहे. येथील सर्व रहिवाशांना पात्र ठरवत घर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धारावीत पाच वर्षांपर्यंत तेथील व्यवसायांवर कर सवलती देण्यात येतील. धारावी ही औद्योगिक वसाहत होऊन तिथेच रोजगार निर्मितीसुद्धा करण्यात येणार आहे.
बीडीडीतील घरे म्हणजे ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक
बीडीडी चाळीचा इतिहास खूप मोठा आहे. या चाळीच्या भिंतीमध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या कथा, कहाण्या दडलेल्या आहेत. अनेक कुटुंबांचे दुःख, आनंद, प्रगती या भितींनी पाहिली आहे. या चाळी केवळ घरे नसून तर मुंबईच्या सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचा एक जिवंत इतिहास आहे, असेही मुख्यमंत्र फडणवीस यांनी सांगितले. बीडीडी चाळवासियांना मिळालेली घरे ही केवळ बांधकाम नसून, पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक आहे. हा ठेवा पुढील पिढीला द्यायचा आहे त्यामुळे कोणीही यातील घर विकू नये, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी केले.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प गुणवत्तापूर्ण पुनर्विकासाचा नवा आदर्श – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मागील तीन-चार पिढ्यांपासून बीडीडी चाळीत राहणाऱ्या हजारो कुटुंबांच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता वास्तवात उतरत आहे. केवळ घर नव्हे, तर उत्तम दर्जा, आधुनिक सुविधा आणि दीर्घकालीन टिकाऊपणा हे या पुनर्विकासाचे वैशिष्ट्य ठरत आहे. हा प्रकल्प पुनर्विकासाचा नवा आदर्श आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बांधकामातील ‘ सेलेबल कंपोनंट’ सारखीच उच्च गुणवत्ता थेट रहिवाशांच्या घरांसाठी ठेवण्यात आली आहे. या इमारती पुढील १०० वर्षे टिकाव्यात, १२ वर्षे मेंटेनन्स मुक्त राहाव्यात यासाठी उत्कृष्ट साहित्य व तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. जागेचा पुरेपूर वापर, सुयोग्य आराखडे आणि रहिवाशांच्या गरजा लक्षात घेत बांधकाम करण्यात आले आहे. ब्रिटिश काळात कामगारांसाठी बांधलेल्या बीडीडी चाळीमध्ये देशभरातील विविध भागांतून आलेल्या लोकांनी आयुष्य घालवले. या परिसराने कामगार चळवळी, सामाजिक आंदोलनं, सांस्कृतिक घडामोडी अनुभवलेल्या आहेत. आज त्या ठिकाणीच, आधुनिक इमारती, मोकळी जागा, गार्डन, मैदान, क्लब हाऊससारख्या सुविधा देऊन एक ‘वॉक टू वर्क’ संकल्पना प्रत्यक्षात आणली जात आहे. या सदनिकांचे मालकी हक्क महिलांच्या नावे असावे, यासाठी काही तरतूद करावी, अशा सूचनाही यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
चावी मिळालेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य – उपमुख्यमंत्री अजित पवार
बीडीडी चाळ पुनर्विकास योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील घरांचे वितरण हा भावनिक क्षण आहे. जुन्या १६० चौरस फूट घरांतून आता ५०० चौरस फूट सुसज्ज घरात जायला मिळत आहे. चावी हातात घेतलेल्या प्रत्येक रहिवाशाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, बीडीडी चाळ या ‘मिनी भारताने’ देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, क्रांतिकारकांची प्रेरणा, तसेच सामाजिक-राजकीय घडामोडींचे हे केंद्र राहिले आहे. वासुदेव बळवंत फडके यांसारखे क्रांतिकारी येथे घडले. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या ‘बटाट्याची चाळ’ मधून उभा राहिलेला चाळीचा जिवंत इतिहास आजही स्मरणात आहे.