
गोंदिया :
महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार उद्योगजगता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज गोंदियातील माओवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस शिपाई सागर राऊत यांच्या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वनपर विचारपूस केली.
दिनांक 30 मे 2005 रोजी सालेकसा पोलीस स्टेशन हद्दीतील देवार टोला धरणाच्या कामादरम्यान माओवाद्यांनी संरक्षणासाठी नेमलेल्या पोलीस वाहनावर ब्लास्टिंग व अँबुश लावून गोळीबार करत हल्ला केला होता. या भीषण घटनेत गोंदिया जिल्हा पोलीस दलातील 2 पोलीस अधिकारी आणि 5 पोलीस अंमलदार शहीद झाले, तर 2 अंमलदार गंभीर जखमी झाले होते. शहीद झालेल्यांमध्ये पोलीस शिपाई सागर राऊत यांचा समावेश होता.
हेही वाचा : झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अविवाहित असल्याने अनुकंपा तत्वावर त्यांच्या धाकट्या भावाला, विशाल राऊत यांना गोंदिया जिल्हा पोलीस दलात मंत्रालयीन कर्मचाऱ्याच्या पदावर नेमणूक देण्यात आली आहे. सध्या ते पत्नी, मुलगा, आई व वडील यांच्यासह गोंदियात राहतात. मंत्री लोढा यांनी या वेळी शहीद राऊत यांच्या शौर्याची आठवण करून देत कुटुंबाच्या दुःखात आपली भावना व्यक्त केली आणि राज्य सरकार कडून शहीद कुटुंबांना नेहमीच पाठबळ राहील, असे आश्वासन दिले.