
मुंबई :
गोविंदा रे गोपाळाचा जयघोष करत शनिवारी मुंबईतील विविध गोविंदा पथके उंचच्या उंच थर लावत असतात. मात्र अनेकदा थर कोसळल्याने गोविंदा खाली पडून जखमी होतात. गेल्या काही वर्षांत मुंबई, ठाणे, नवी मुंबईत या दहीहंडी उत्सवादरम्यान कित्येक गंभीर जखमी झाले आहेत, ज्यामध्ये डोक्याला दुखापत, फ्रॅक्चर आणि पाठीच्या कण्याला झालेल्या दुखापतींचा समावेश आहे. त्यामुळे दहीहंडीमध्ये जखमी गोविंदाना तातडीने मदत मिळावी यासाठी मुंबईतील सरकारी रुग्णालये सज्ज झाली आहेत. त्यानुसार सर्व रुग्णालयांनी जखमी गोविंदांसाठी स्वंतत्र खाटा राखीव ठेवल्या असून, औषधोपचारही उपलब्ध करून ठेवले आहेत.
दरवर्षी थर काेसळल्याने अनेक गोविंदा जखमी होतात. यामध्ये अनेकांची प्रकृती गंभीर असते. तर काहीजणांना किरकोळ उपचाराची गरज असते. ही बाब लक्षात घेत मुंबईतील रुग्णालये गोविंदांच्या उपचारासाठी सज्ज झाली आहे. जे.जे. रुग्णालयामध्ये गोविंदांवर उपचाचरासाठी स्वतंत्र रुग्णकक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. यामध्ये ३० खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया विभाग व अस्थिव्यंग विभागातही काही खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे अपघात विभागामध्ये सर्व सुविधा व औषधे उपलब्ध ठेवण्यात आली असल्याची माहिती जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी दिली.
गिरगाव, काॅफ्रर्ट मार्केट, कुलाबा या परिसरात दहीहंडी फोडताना जखमी होणाऱ्या रुग्णांना जी.टी. रुग्णालयामध्ये आणले जाते. दरवर्षी मोठ्या प्रमाणात जखमी गोविंदा येत असल्याने त्यांच्या उपचारासाठी विशेष कक्ष तयार ठेवला आहे. अस्थिव्यंग विभाग व शस्त्रक्रिया विभागातील डाॅक्टरांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जखमी गोविंदांसाठी सहा खाटा राखीव ठेवण्यात आली असल्याची माहिती जी.टी. रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जीतेंद्र संकपाळ यांनी दिली. सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये येणाऱ्या जखमी गोविंदांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉक्टर सज्ज ठेवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पाच खाटा राखीव ठेवण्यात आल्याची माहिती सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी दिली.
हेही वाचा : झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई व ठाण्यामध्ये जखमी होणाऱ्या बहुतांश गोविंदांना केईएम रुग्णालयात आणण्यात येते. त्यामुळे या जखमी गोविंदांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी नुकताच सर्व सुविधांचा आढावा घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयामध्ये १५ खाटा जखमी गोविंदांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये अतिदक्षता विभागातील खाटांचा समावेश आहे. तसेच अस्थिव्यंग विभागामध्ये चार खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून, जीवनरक्षक प्रणालीही सज्ज ठेवण्यात आली असल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन देसाई यांनी दिली.
आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जारी
दुखापतग्रस्त गोविंदांना गोल्डन अवरमध्ये म्हणजेच पहिल्या ६० मिनिटांत उपचार मिळावेत यासाठी नवी मुंबईतील न्यूईरा हॉस्पिटलने २४×७ उपलब्ध ९१७२९७०१११ आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यास जखमी गोविंदांवर त्वरीत उपचाराकरिता वैद्यकीय मदत मिळणार आहे. तसेच रुग्णालयामध्ये जखमी गोविंदांसाठी १० आपत्कालीन खाटा राखीव ठेवले आहेत. जागेअभावी कोणत्याही रुग्णाला उपचारापासून वंचित रहावे लागू नये आणि पीडितांना त्वरित उपचार मिळावेत याची खास काळजी घेण्यात आली असल्याची माहिती न्यूईरा रुग्णालयातील मज्जातंतू शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. सुनील कुट्टी यांनी दिली.