
मुंबई :
मुंबई येथील प्रसिद्ध चित्रकार निलेश रवींद्र वेदे यांच्या “आय, मी अँड मायसेल्फ” या चित्रकृतीला ललित कला अकादमी आयोजित ६४व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनामध्ये प्रतिष्ठित “राष्ट्रीय पुरस्कार” सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून जाहीर करण्यात आला असून, लवकरच हा पुरस्कार भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे प्रदान करण्यात येणार आहे. यंदा या पुरस्कारासाठी देशभरातून सहभागीत ५,९२२ कलाकृतींपैकी चित्रकार निलेश वेदे यांच्या चित्राची निवड करण्यात आली असून, भारतीय चित्रकला क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून या पुरस्काराची ख्याती आहे.
दिल्ली येथे ६४व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनाच्या उद्घाटन आणि ललित कला अकादमीच्या ७१व्या स्थापना दिनाच्या समारंभात निलेश वेदे यांचा सन्मान, पद्म भूषण श्री राम व्ही. सुतार (सुप्रसिद्ध शिल्पकार) आणि श्री गजेंद्र सिंह शेखावत (सांस्कृतिक व पर्यटनमंत्री, भारत सरकार) यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास श्री विवेक अगरवाल, (सचिव, सांस्कृतिक मंत्रालय), श्रीमती अमिता प्रसाद सारभाई (अतिरिक्त सचिव, सांस्कृतिक मंत्रालय) आणि डॉक्टर नंदलाल ठाकूर (उपाध्यक्ष, ललित कला अकादमी) उपस्थित होते.
निलेश वेदे यांनी चित्रकला क्षेत्रात स्वतःची एक स्वतंत्र शैली निर्माण केली असून, त्यांच्या चित्रांमध्ये मानवी भावनांचे सखोल चित्रण दिसून येते. त्यांची गहन अर्थपूर्ण चित्रं प्रेक्षकांना भावनांच्या विविध आयमांशी परिचित करतात व वैचारिक स्तरावर स्वतःशी सुसंवाद करण्यास भाग पाडतात. त्यांच्या चित्रशैलीमध्ये सर्रियलिझम (अप्रत्यक्ष वास्तववाद) आणि शाब्दिक आकारांचे मिश्रण आहे, जे वास्तव आणि कल्पनाशक्ती यांचा सुरेख संगम साधते. या स्वप्नवत जागांमध्ये प्रतीकात्मकता आणि रूपकांचा वापर लक्षणीय आहे. त्यांच्या चित्रांमध्ये आशयाला महत्त्वाचे स्थान आहे, जे प्रामुख्याने तत्त्वचिंतनात्मक संकल्पना आणि सिद्धांतांवर आधारित असते. स्वतःला कलेचे साधक मानून सृजनशीलतेला ते एक ध्यानधारणाच समजतात, ज्यातून कॅनव्हासवर अनेक सूक्ष्म अर्थ उलगडत जातात आणि ती कलाकृती दर्शकांना अंतर्मुख करून एक चिंतनशील मानसिक स्थिती प्रदान करते.
या पूर्वी त्यांना दोनदा सांस्कृतिक मंत्रालयाकडून शिष्यवृत्ती मिळाल्या असून प्रफुल्ला धहानुकर फाऊंडेशन तर्फे राज्य पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी जहांगीर कलादालन सहित देशातील नामांकित कलादालनात ६ वैयक्तिक, ३० पेक्षा जास्त सामाहिक प्रदर्शने भरवलीत, त्यात काही परदेशातही प्रदर्शित केली गेली. तसेच ३० पेक्षा जास्त कला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शिबिरांसाठी ते आमंत्रित केले गेले. देशातील मनावर कला समीक्षकांनी त्यांच्या चित्रांचे भरभरून कौतुक केले असून वेळा वेळी समाज माध्यमांनी देखील त्यांच्या कार्याची दखल घेतली.
हेही वाचा : दहीहंडी बांधताना मानखुर्दमध्ये एकाचा मृत्यू, ७५ जखमी; दोघांची प्रकृती चिंताजनक
निलेश वेदे यांची चित्रं देश विदेशातील अनेक मान्यवर कलाप्रेमीच्या व कला संग्रहकांच्या संग्रहात असून त्यांच्या चित्रांना संपूर्ण देशातून कलातज्ञांकडून दाद मिळत आहे. यापूर्वी त्यांची चित्रे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात प्रदर्शित झाली आहेत. हा पुरस्कार मिळाल्यामुळे निलेश वेदेंचे नाव भारतीय कला जगतात प्रसिद्ध झाले असून, त्यांच्या कलात्मक दृष्टिकोन, कौशल्य आणि त्यांचे भारताच्या सांस्कृतिक परंपरेतील त्यांच्या योगदानाचे प्रतीक ठरत आहे.
निलेश वेदे यांच्या कलाकृतीचे काही कलासंग्रहक
डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम, सलमान खान, आमिर खान, जॅकी श्रॉफ, सुभाष घई, हृतिक रोशन, सोनाक्षी सिन्हा, महेश मांजरेकर, अनुपम खेर, अतुल अग्निहोत्री, हर्ष गोयंका, बोनी कपूर, आरिफ झकारिया, वर्ल्ड ट्रेड सेंटर (पुणे), डाबर लिमिटेड, फेबर कासल