शहर

एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत महागाई भत्त्याची रक्कम एक हजार कोटींवर

रक्षाबंधन ओवाळणी उत्पन्नातील काही हिस्सा कर्मचाऱ्यांना देण्याची मागणी

मुंबई : 

एसटी कर्मचाऱ्यांची एक हजार कोटी रुपयांची महागाई भत्त्याच्या फरकाची रक्कम गेल्या काही वर्षांपासून थकीत असून रक्षाबंधन कालावधीत एसटीला मिळालेल्या विक्रमी उत्पन्नात कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे या रकमेतील काही हिस्सा एसटी कर्मचाऱ्यांना थकीत महागाई भत्ता देण्यासाठी वापरण्यात आला पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

एसटी ही अत्यावश्यक सेवा असल्याने कर्मचारी कुठल्याही सणाला कुटुंबासोबत नसतात. उन, वारा, पाऊस किंवा कुठलीही आपत्ती असुदेत कुठल्याही अडचणीच्या परिस्थितीच्या वेळी प्रवाशांचे सण, उत्सव, यात्रा व जत्रा सुखकर व्हाव्यात यासाठी आपले नेमून दिलेले काम पार पाडत असताना सेवाभावी दृष्टिकोन ठेवून ते रात्रंदिवस प्रवाशांना सेवा देत असतात. सुदैवाने यावेळी रक्षाबंधन कालावधीत एसटीच्या उत्पन्नात १३७ .३७ कोटी रुपये इतकी भरघोस वाढ झाली असून ज्यांनी स्वतःच्या कुटुंबासोबत रक्षा बंधन सण साजरा न करता, राज्यभरातील भावा – बहिणीना उचित स्थळी घेऊन जाऊन त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचे काम केले अशा एसटी कर्मचाऱ्यांची महागाई भत्त्याच्या फरकाची एक हजार कोटी रुपये इतकी रक्कम गेले काही वर्षे थकीत असून रक्षाबंधन कालावधीत मिळालेल्या ओवाळणी उत्पन्नातील काही हिस्सा कर्मचाऱ्यांना दिल्यास त्यांचाही आनंद द्विगुणित होईल असेही बरगे यांनी म्हटले आहे.

महागाई भत्ता थकबाकी फरक रक्कम कालावधी

एप्रिल २०१६ ते मार्च २०२०, या कालावधीतील सी.टी. सी. सह १६५ कोटी रुपये इतकी फरक रक्कम थकीत असून एप्रिल २०२० ते मार्च २०२४ या कालावधीतील सी. टी. सी. रक्कमेसह ६६० कोटी रुपये इतकी फरकाची रक्कम थकीत आहे .जानेवारी २०२४ ते जून २०२४ या कालावधीतील ५४ कोटी रुपये इतकी फरक रक्कम थकीत असून जुलै २०२४ ते एप्रिल २०२५ या कालावधीतील सी. टी. सी. रक्कमेसह २०० कोटी रुपये इतकी फरक रक्कम थकीत आहे .एकूण १००० कोटी रुपये इतकी महागाई भत्त्याची फरक रक्कम थकीत असून ती कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली नाही. सण, उत्सव, यात्रा व जत्रा या कालावधीत एसटीला चांगले उत्पन्न मिळत असून वाढीव उत्पन्नातील काही हिस्सा कर्मचाऱ्यांना देण्यात यावा अशी विनंतीही प्रशासनाकडे केली असल्याचे बरगे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : गोविंदा पथकांचा दहीहंडीद्वारे भारतीय सैन्य दलाच्या शौर्याला सलाम

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *