
मुंबई :
भारतीय हवामान विभागाने मुंबईमध्ये सोमवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेत मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना दुपारच्या सत्रात सुट्टी जाहीर करण्यात आल आहे. तसेच सर्व यंत्रणांना सुसज्ज राहण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
मुंबई व आसपासच्या परिसरामध्ये आठवडाभर मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार सोमवारी पहाटेपासूनच मुंबईमध्ये जोरदार सुरू पाऊस होत आहे. या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या तर अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला. रेल्वेही धीम्या गतीने धावत आहे. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांना शाळेत पोहचण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सकाळपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मुंबईतील दुसऱ्या सत्रातील अर्थात दुपारी १२ वाजेनंतर भरणाऱ्या सर्व शाळा, महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी जाहीर केली आहे. तसेच आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा : शालार्थ प्रणालीत शिक्षकांची कागदपत्रे अपलोड करण्यासाठी मुदतवाढ द्या
काही आवश्यकता भासल्यास मदतीसाठी व अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या १९१६ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबईमध्ये १९ ऑगस्ट रोजीही रेड अलर्ट
भारतीय हवामान खात्याने मुंबई महानगरासाठी १८ ऑगस्ट व १९ ऑगस्ट २०२५ असे दोन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर, सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की, आवश्यक नसेल तर घराबाहेर पडणे कृपया टाळावे. तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. १९ ऑगस्ट रोजी रेड अलर्ट जाहीर करण्यात आल्याने मंगळवारीही सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी विनंती पालकांकडून करण्यात येत आहे.