शिक्षण

मुंबई – ठाण्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना १९ ऑगस्ट रोजी सुटी

मुंबई :

हवामान खात्याने १९ ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये दिलेल्या अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे मुंबई व ठाणे महानगरपालिकेने शहरातील शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे. सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे दुपारच्या सत्रामध्ये सुटी जाहीर केल्यानंतर आता मंगळवारीही सुटी जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा : मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव ओसंडून वाहू लागला

मुंबई व ठाण्यामध्ये १७ ते २१ ऑगस्ट दरम्यान जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार मुंबईमध्ये मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. शनिवार व रविवार सुटी असल्याने जोरदार पडलेल्या पावसाचे परिणाम जाणवले नाही. मात्र सोमवारी पहाटेपासूनच जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या तर अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला. या पार्श्वभूमीवर, सकाळपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मुंबईतील दुसऱ्या सत्रातील अर्थात दुपारी १२ वाजेनंतर भरणाऱ्या सर्व शाळा, महाविद्यालयांना सोमवारी सुटी जाहीर केली. मात्र मंगळवारीही हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देत रेड अलर्ट जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेत मुंबई महानगरपालिकेने मुंबई शहर आणि उपनगरातील सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालये यांना सुटी जाहीर केली आहे. तसेच ठाणे महानगरपालिकेनेही सोमवारी सुटी जाहीर केली आहे. तसेच आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक

काही आवश्यकता भासल्यास मदतीसाठी व अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या १९१६ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *