
मुंबई :
अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘ओपन टू ऑल’ च्या दुसऱ्या विशेष फेरीअंतर्गत राज्यभरातून ८५ हजार १०१ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १९ ते २२ ऑगस्टपर्यंत प्रत्यक्षात महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. त्यामध्ये पहिल्या दिवशी १८ हजार ८४५ विद्यार्थांनी प्रवेश घेतला असून, मुंबई विभागातून २ हजार १४२ विद्यार्थ्यांना प्रवेश घेतली आहे.
यंदा राज्यात प्रथमच इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्यातील एकूण ९ हजार ५२८ कनिष्ठ महाविद्यालयांची एकूण प्रवेश क्षमता २१ लाख ५४ हजार ६९२ इतकी आहे. या जागांसाठी आतापर्यंत १४ लाख ७१ हजार ७४७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली असून, त्यातील १२ लाख २२ हजार २५० विद्यार्थ्यांनी अकरावीला प्रवेश घेतले आहेत. ‘ओपन टू ऑल’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या दुसऱ्या विशेष फेरीची निवड यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली.
हेही वाचा : मोनोमध्ये अडकले प्रवासी, मुंबईची जीवनवाहिनी कोलमडली
या यादीत ८५ हजार १०१ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये प्राधान्यक्रमानुसार कला शाखेसाठी २३ हजार ९६१, वाणिज्य शाखेसाठी २४ हजार १४५ आणि विज्ञान शाखेसाठी ३६ हजार ९९५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १९ ते २२ ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. त्यानुसार पहिल्याच दिवशी १८ हजार ८४५ विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश निश्चित केलेले आहेत. त्यामध्ये नियमित फेरीमध्ये एकूण १८ हजार ८२ इतके प्रवेश झालेले आहेत. तसेच व्यवस्थापन कोटा व अल्पसंख्यांक कोट्यांतर्गत ७६३ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत.