
मुंबई :
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीसह रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन नियमावली आणण्यात येत आहे. ही नियमावली अंतिम करून याबाबत तातडीने अधिसूचना जारी करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. परिवहन आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत स्कूल व्हॅन बाबत सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी परिवहन मंत्री बोलत होते. बैठकीस परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर, अपर परिवहन आयुक्त भरत कळसकार, सह परिवहन आयुक्त जयंत पाटील आदी उपस्थित होते. सेवानिवृत्त अतिरिक्त परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी सादरीकरण केले.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, अत्याधुनिक सुरक्षा व सुविधांनी युक्त असलेली अधिकृत स्कूल व्हॅन विद्यार्थ्यांना उपलब्ध होण्यासाठी आधीच्या नियमात बदल करण्यात येऊन नियमावली सुटसुटीत करावी. स्कूल व्हॅनचे भाडे मासिक तत्वावर आणि वर्षाच्या १० महिने कालावधीपर्यंतच घेण्याबाबत बंधन असावे. नियमावलीमध्ये परिवहन समित्यांचे सक्षमीकरण, महिन्यातून एकदा समितीची बैठक होणे, प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नोडल अधिकारी नेमणे अंतर्भूत असावे. देशात सुरक्षित विद्यार्थी वाहतूकीसाठी केंद्र सरकारने स्कूल बस नियमावलीचा (ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड्स अर्थात एआयएस-०६३) आधार घेऊन अद्यावत मानके अर्थात स्कूल व्हॅन नियमावली (एआयएस-२०४ ) तयार केली आहे. चारचाकी १२+१ आसनापर्यँत विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी वाहनाला शालेय व्हॅनचा दर्जा देण्यात येणार आहे. वाहने BS-VI या श्रेणीतील असतील. यात चालक ओळखपत्र, आपत्कालीन निर्गमन, वाहन प्रवेश, स्टोरेज रॅक यांच्या स्पष्टतेसह आसन रचना, अग्निशमन अलार्म यंत्रणा, वाहन ट्रॅकिंग अशा आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचा ही समावेश आहे, असेही परिवहन मंत्री श्री सरनाईक यांनी सांगितले.
हेही वाचा : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सवादरम्यान जड वाहनांना वाहतूक बंदी
परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले, स्कूल बस भाडे परवडत नसलेले पालक विद्यार्थ्यांसाठी अनेकदा अवैध रिक्षाचा पर्याय अवलंबतात. रिक्षाच्या तुलनेत व्हॅनमध्ये अधिक सुरक्षेची तरतूद आहे. व्हॅनचे दरवाजे बंद असतात. व्हॅनमध्ये शाळेची बॅग, पाण्याची बाटली आणि अन्य साहित्य ठेवण्यासाठी पुरेशी जागा असते.
अशी असेल स्कूल व्हॅन
- जीपीएस
- सीसीटीव्ही आणि डॅशबोर्डवर स्क्रीन
- अग्निशमन अलार्म प्रणाली
- दरवाजा उघडा राहिल्यास अलार्म यंत्रणा
- ताशी ४० वेगमर्यादेसह स्पीड गव्हर्नर
- पॅनिक बटण, आपत्कालीन दरवाजे
- स्कूल व्हॅनमध्ये लहान विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पायरी
- गाडीच्या छतावर शाळेचे नाव