
नवी मुंबई (उमेश मोहिते) :
आदर्श फाऊंडेशन, हॅप्पी हरदा आणि गुणवंत कामगार संघटना, मुंबई यांच्या संयुक्त सौजन्याने “मोफत टाळ वादन प्रशिक्षण शिबिर व इतर ताल वाद्यांची माहिती” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत जागृतेश्वर शिव मंदिर, सेक्टर ७, वाशी, नवी मुंबई येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने संपन्न झाले. या कार्यक्रमात कीर्तनकार, अभिनेते, नाट्यदिग्दर्शक, गायक तसेच गो. सु. वै. महाविद्यालय व के. ई. एम. रुग्णालयातील शरीररचना शास्त्र विभागाचे प्रमुख ह. भ. प. प्रा. डॉ. किशोर खुशाले यांनी उपस्थितांना तालवाद्यांच्या परंपरा, महत्त्व आणि साधनेविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या अनुभवसंपन्न आणि प्रेरणादायी संवादाने उपस्थित श्रोत्यांना ताल वादनाच्या विविध अंगांबाबत नवचैतन्य प्राप्त झाले.
हार्मोनियम व गायन – विजय देसाई, तबला व ढोलक – ओमप्रकाश साळसकर, पखवाज – पवित्र सावंत, गायिका – वर्षा लोकरे यांनी कार्यक्रमात संगीत साथ दिली. या सर्व कलाकारांनी आपल्या सुरेल आणि समर्पित सादरीकरणाने वातावरण भक्तिमय केले. अशोक बटलू यांनी कलाकारांचे व्यवस्थापन केले.
आदर्श फाऊंडेशनचे संस्थापक सदस्य व सचिव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की,टाळांचे अनेक प्रकार यांचे अतिशय चांगल्या प्रकारे सादरीकरण प्रा. डॉ. किशोर खुशाले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहात, भक्तिमय वातावरणात पार पडला. टाळ शिकायला आलेला प्रत्येक व्यक्ती तल्लीन होऊन कार्यक्रमाचा आनंद घेत होता. कार्यक्रमांमध्ये चांगल्या प्रकारचे तालवाद्य पाहायला मिळाली. ताल वाद्यांचे प्रकार, त्यांची नावे आणि कोणत्या गाण्यात वाजवण्यात आले याचे प्रात्यक्षिकही पाहायला मिळाले. या कार्यक्रमाला दर्दी लोक उपस्थित असल्यामुळे या कार्यक्रमाची शोभा वाढली. आदर्श फाउंडेशन, हॅपी हरदा, गुणवंत कामगार संघटना, मुंबई, जागृतेश्वर शिव मंदिर, वाशी यांचे सर्व कार्यकारणी, पदाधिकारी, सहकारी तसेच टाळ वादन प्रशिक्षण घेण्यासाठी उपस्थित रसिकांचेही आभार मानले.
प्रा. डॉ. किशोर खुशाले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,आदर्श फाउंडेशन, हॅप्पी हरदा आणि गुणवंत कामगार संघटना, मुंबई या संस्थांनी टाळ वादनाचे प्रशिक्षण शिबिर आणि ताल वाद्यांची माहिती, ओळख व त्यावरील गाणी करण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानले. विजय देसाई सर यांनी गायनाची साथसंगत, तबला – ढोलक – बोंगो साथ ओमप्रकाश साळसकर, मृदुंग आणि इतर वाद्यांसाठी साथ पवित्र चव्हाण तसेच गायिका वर्षा लोकरे गायनसाथ या सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमांमध्ये ताल वाद्यांबरोबर एकूण ४० ते ५० गाणी सादर करण्यात आली. वाद्यांचे महत्त्व आणि गाण्यात कसे वाजवतात याचे प्रात्यक्षिक दिले. ही वाद्य पहाण्याची प्रेक्षकांनाही संधी मिळाली. असे कार्यक्रम करण्याची संधी पुन्हा द्यावी असे आवाहन केले.
हेही वाचा : अतिवृष्टीमुळे साचलेल्या पाण्यामुळे लेप्टोचा धोका
या कार्यक्रमाचे आयोजन व मोलाचे योगदान श्रीराम पुराणिक ( संस्थापक सदस्य व सचिव, आदर्श फाऊंडेशन ), प्रकाश बाडकर ( सल्लागार कार्यकारी सदस्य, आदर्श फाऊंडेशन व अध्यक्ष – गुणवंत कामगार संघटना ), राजीव बाहेती ( सल्लागार कार्यकारी सदस्य, हॅप्पी हरदा व आदर्श फाऊंडेशन ), उमेश मोहिते ( सल्लागार कार्यकारी सदस्य, आदर्श फाऊंडेशन ), रामभाऊ पाटील ( विश्वस्त, जागृतेश्वर शिव मंदिर, वाशी ) यांनी केले. विशेष सहाय्य भरत घोडेकर यांनी केले. यावेळी आदर्श फाउंडेशनचे कार्यकर्ते शुभेच्छुक, हितचिंतक, पुरुष – महिला मंडळ,भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.