शिक्षण

दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ

१० सप्टेंबर २०२५ पर्यंत करता येणार ऑनलाइन अर्ज

मुंबई :

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) (पूर्वीचे आयडॉल ) पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारीत वेळापत्रकानुसार आता विद्यार्थांना १० सप्टेंबर २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सर्व पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी किमान पात्रता धारकांना थेट प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. शिकण्याची लवचिकता, परवडणारे शिक्षण शुल्क, युजीसी (डीईबी) आणि एआयसीटी मान्यताप्राप्त अभ्यासक्रम हे सीडीओईची बलस्थाने आहेत. दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रात पहिल्यांदाच पदवी स्तरावरील अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राबवली जात आहे.

पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील या सर्व अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया https://mucdoeadm.samarth.edu.in/ या संकेत स्थळावरून करता येणार आहे. प्रवेश प्रक्रीयेसंबधातील सर्व तपशील आणि माहिती पुस्तिका (प्रॉस्पेक्ट्स) विद्यापीठाच्या https://mu.ac.in/distance-open-learning/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सीडीओईमार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांसाठी तज्ज्ञ व अनुभवी पूर्णवेळ प्राध्यापक या संस्थेत उपलब्ध आहेत.

हेही वाचा : अतिवृष्टीमुळे साचलेल्या पाण्यामुळे लेप्टोचा धोका

ज्या विद्यार्थ्यांना काही अडचणींमुळे आपले महाविद्यालयीन शिक्षण औपचारिक शिक्षण पद्धतीतून पूर्ण करता येत नाही अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठामार्फत चालविण्यात येत असलेल्या विविध अभ्यासक्रमांची दालने खुली करून देणे हा संस्थेचा मुख्य उद्देश्य आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना नियमित महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही अशा किमान पात्रता धारक विद्यार्थ्यांना थेट प्रवेशाची संधी दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्रात उपलब्ध करून दिली जात आहे. सीडीओईचे चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी व सावंतवाडी येथे विभागीय केंद्रे असून या ठिकाणी प्रवेशासंबंधी मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण केले जाते. तसेच अलीकडेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात विद्यार्थी सहाय्यता केंद्रे स्थापन करण्यात आली असून नजीकच्या काळात पालघर येथेही लवकरच विभागीय केंद्र सुरु होणार असल्याचे दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे (सीडीओई) संचालक प्रा. शिवाजी सरगर यांनी सांगितले.

पदवी स्तरावरील अभ्यासक्रम

बीए (इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, भूगोल, ग्रामीण विकास, मराठी, हिंदी, आणि इंग्रजी) या विषयांचा समावेश आहे. बीकॉम ( कॉमर्स, अकाऊटंसी, आणि बीझनेस मॅनेजमेंट), बीकॉम (अकाऊंट अँड फायनान्स), बीएस्सी (माहिती तंत्रज्ञान), बीएस्सी (संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांचा समावेश असून या सर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केले जात आहेत.

पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रम

एम.ए. (इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र, संज्ञापन आणि पत्रकारिता, जनसंपर्क); एम. कॉम. (ऍडव्हान्स अकाउंटन्सी), एम. कॉम. (बिझनेस मॅनेजमेंट), एम.एस्सी. (गणित) एम.एस्सी. (माहिती तंत्रज्ञान), एम.एस्सी. (संगणकशास्त्र) एमएमएस, एमसीए या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युअट डिप्लोमा इन फायन्साशिअल मॅनेजमेंट (पीजीडीएफएम) या अभ्यासक्रमाचा समावेश आहे. या सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेशही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राबविले जात आहेत.

पहिल्यांदाच एम.ए. समाजशास्त्र ऑनलाईन

दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रात पहिल्यांदाच या शैक्षणिक वर्षापासून एम. ए. समाजशास्त्र हा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात आला असून या अभ्यासक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये म्हणजे प्रवेश प्रक्रिया ते परीक्षा ही सर्व प्रकिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे. पात्रता धारक कोणत्याही विद्यार्थ्यांना कुठूनही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *