
मुंबई :
कानात ईअर फोन लावून पाण्यातून चाललेल्या एका युवकाला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्देवी घटना पन्नालाल कंपाऊंड, एलबीएस मार्ग, भांडुप पश्चिम येथे घडली. पाण्यात विजेचा प्रवाह आल्याने या तरुणाला त्याचा शॉक लागला. खा. संजय दिना पाटील यांनी संबंधीत जबाबदार अधिका-यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
व्हिलेज रोड, भांडुप पश्चिम येथे राहणारा दिपक पिल्लई (१७) हा युवक काल दुपारी साडे १२ वाजण्याच्या सुमारास पन्नालाल कंपाऊंड, एलबीएस रोडवरुन जात होता. पावसामुळे साचलेल्या पाण्यात विज प्रवाह आल्याने त्याचा शॉक लागून दिपक याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी पाण्यात वीज प्रवाह असून तेथून जावू नकोस असा सांगण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. मात्र दिपकच्या कानात ईअर फोन असल्याने त्याला लोकांचे ऐकू आले नाही. नागरीकांनी लाकडाच्या सहाय्याने दिपकला बाजुला काढून नजीकच्या रुग्णालयात घेऊन गेले. मात्र त्याला दाखल करण्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करुन त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. दरम्यान, सकाळी ९ वाजल्यापासून या ठिकाणी शॉक लागत असल्याची तक्रार नागरीकांनी महावितरणच्या विभागाला केली होती. संबंधीत विभागाने घटनास्थळी येऊन त्याची पाहणी केली व तक्रारीची दखल घेऊन काम पुर्ण केल्याची माहिती नागरीकांना दिली. मात्र दुपार पर्यत याच ठिकाणी पुन्हा पाच ते सहाजणांना शॉक लागला सुदैवाने नागरीकांनी या लोकांना वेळीच सावध केल्याने ते वीज प्रवाहापासून दूर झाले. मात्र दिपकच्या कानात ईअर फोन असल्याने त्याला लोकांचा आरडाओरडा ऐकू आला नाही व तो विद्युत प्रवाहाच्या खुपच जवळ गेल्याने शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले असून जबाबदार लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.