शिक्षण

मुंबई विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेसाठी २५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदतवाढ

मुंबई :

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाशी सलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये, मान्यताप्राप्त शिक्षण संस्था आणि विद्यापीठ शैक्षणिक विभागाच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी २५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेशित होऊ इच्छिणाऱ्या काही विद्यार्थ्यांचे पुनर्परीक्षा आणि पुनर्मूल्यांकनाचे जाहीर झालेले निकाल तथा व्यापक विद्यार्थीहित लक्षात घेऊन सर्व इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश घेता यावा तसेच कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी मुंबई विद्यापीठामार्फत प्रवेशप्रक्रियेस २५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

हेही वाचा : दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ

मुंबई विद्यापीठामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर सामान्य गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा असून प्रवेश देऊन जागा रिक्त राहिल्यास महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर गुणवत्ता यादी जाहीर करून विद्यार्थ्यांना प्रवेशित करावे असे परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले. ज्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in/admission या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्या महाविद्यालयाचा संबंधित अभ्यासक्रमांसाठीचा ऑनलाईन अर्जही भरणे अनिवार्य असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेशीत करण्याची प्रक्रिया २५ ऑगस्ट २०२५ या विहित कालावधीत पूर्ण करावी असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : कल्याणमध्ये उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार; तीन माजी नगरसेविकांचा शिवसेनेत प्रवेश

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *