
भांडुप :
भांडुपच्या गणेश नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात यंदा प्रथम दर्शनाचा सोहळा अत्यंत थाटात आणि भक्तिभावाने संपन्न झाला. मंडळाच्या भव्य मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या, आणि वातावरणात “गणपती बाप्पा मोरया”चा जयघोष घुमत राहिला.
या वर्षीच्या उत्सवात एक विशेष घटना सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे, नवसाला पावणाऱ्या गणाधिपतीस एका लाडक्या भक्ताने लाखो रुपयांच्या किमतीचे चरण अर्पण केले. हे सुवर्ण पाऊल मूर्तीच्या चरणांमध्ये प्रतिष्ठापित करण्यात आले असून, त्याचा तेजस्वी झळाळ आपल्या भक्तीचा उत्कट भाव प्रकट करतो.
मंडळाचे सदस्य कार्यकारिणी प्रवीण वाक्कर आणि अमर बागवे यांनी सांगितले की, “गणेश नगरच्या गणाधिपतीवर भक्तांचे अपार प्रेम आहे. यंदा एका भाविकाने आपल्या नवसपूर्तीनंतर हे चरण अर्पण करून भक्तीचा नवा आदर्श निर्माण केला आहे.” संपूर्ण परिसरात या दानाची चर्चा असून, अनेक भाविकांनी त्या भक्ताच्या भावनेला सलाम केला आहे. मंडळाने यावेळी पर्यावरणपूरक सजावट, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून उत्सवाला अधिक अर्थपूर्ण बनवले आहे.
गणेश नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा हा सोहळा केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक एकतेचा आणि श्रद्धेचा एक सुंदर नमुना ठरला आहे.