मुंबई :
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांनी हाफकिन महामंडळाला १२ मार्च २०२४ रोजी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्याकरिता भेट दिली होती. यावेळी हाफकिन महामंडळाची मान्यताप्राप्त कामगार संघटना यांनी ऍड. नार्वेकर यांना हाफकिन महामंडळातील कर्मचाऱ्यांना गेली २० वर्षांपासून महाराष्ट्र शासनाची आश्वासित प्रगती योजना लागू नसल्याने कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळत नाही आहे. एकाच पदावर वर्षानुवर्षे काम करावे लागते आणि सेवानिवृत्त व्हावे लागते परिणामी सेवानिवृत्त नंतर मिळणारे लाभ पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड आणि ग्रॅज्युईटी हे फारच कमी मिळते. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये निरुत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘आश्वासित प्रगती योजना’ म्हणजे सहाव्या वेतन आयोगानुसार एखाद्या कर्मचारी याला वर्षानुवर्षे काम करून देखील पुढील पदोन्नतीची संधी उपलब्ध होत नसल्यास आश्वासित प्रगती योजनेनुसार त्याला १२ वर्षांनी तो काम करीत असलेल्या पदाच्या वरीष्ठ पदावरील वेतनश्रेणी लागू करण्यात येते. त्यामुळे सदर कर्मचारी याला आर्थिक लाभ आणि पदोन्नती देखील मिळते. सातव्या वेतन आयोगानुसार दर १० वर्षांनी आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात येते.
हाफकिन महामंडळातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात येईल अशी ग्वाही लोकसभा अध्यक्ष ऍड. नार्वेकर यांनी ११ मार्च २०२४ रोजी हाफकिन महामंडळाला दिलेल्या भेटीत कर्मचाऱ्यांना दिली होती, ती त्यांनी २४ तासांत पूर्ण केली. १३ मार्च २०२४ रोजी ऍड. नार्वेकर यांनी हाफकिन महामंडळाला पुन्हा भेट देऊन महाराष्ट्र शासनाकडून आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आल्याबाबतची आनंदाची बातमी स्वतः येऊन हाफकिन महामंडळातील कर्मचाऱ्यांना दिली.
ऍड. राहुल नार्वेकर यांनी पुढील सहा महिन्यांत हाफकिन महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणार आणि त्याकरिता महामंडळावर पडणारा आर्थिक भार व इतर प्रकल्पांकरिता १५० कोटी रुपये मान्य करण्याची ग्वाही दिली.
हाफकिन महामंडळातील कर्मचारी वसाहतीमध्ये व्यायामशाळा सुरू करण्याकरिता शासनाकडून साहित्य देण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले. हाफकिन कर्मचाऱ्यांच्या लहान पाल्यांकरिता असलेल्या बालवाडीकरिता रबर मॅट आणि पत्राचे शेड पुढील आठवड्यात टाकण्यात येईल असे त्यांनी सांगितले. तसेच कर्मचारी वसाहतीमधील कर्मचाऱ्यांकरिता अतिरिक्त शौचालय बांधण्यात यावे असे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. त्यामुळे महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्यामुळे महामंडळातील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपा शिवडी विधानसभा महामंत्री विश्वनाथ तोरसकर यांनी हाफकिन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा केला होता आणि कर्मचारी संघटनेला मार्गदर्शन केले होते.
हाफकिन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री अनिल पाटील(भा.प्र.से.), सुभाष शंकरवार, महाव्यवस्थापक, डॉ. अमित डोंगरे, जनसंपर्क अधिकारी, हाफकिन ऑफिसर्स असोसियशनचे सोनल सावंत आणि बबन ढेकणे, हाफकिन मान्यताप्राप्त कामगार संघटनेचे दीपक पेडणेकर, नितिन तिरलोटकर, दिनेश जगताप आणि महामंडळातील सर्व कर्मचारी आणि अधिकारी वर्ग उपस्थित होते.