मुंबई :
बृहन्मुंबई महानगरपालिकेने आरोग्य सुविधांवर वर्षभरामध्ये सुमारे ७ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये झिरो प्रिस्क्रिप्शन धोरण राबविण्यासाठी सुमारे २ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य सुविधेसाठी इतका मोठा निधी खर्च करणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे. नागरिकांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे, यासाठी विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. आवश्यक असलेल्या सोयी- सुविधांच्या निर्मितीमधून नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी शासन काम करीत राहील, असे प्रतिपादन शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
नायर दंत महाविद्यालय व रूग्णालयाच्या विस्तारीत इमारतीचा लोकार्पण कार्यक्रम नायर महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार यामिनी जाधव, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे उप आयुक्त संजय कुऱ्हाडे, वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयाचे संचालक तथा नायर दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे आदी उपस्थित होते.
नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाची ही विस्तारित नवीन इमारत एखाद्या पंचतारांकित हॉटेलच्या तोडीची आहे. येथील आरोग्यविषयक सुविधाही तितक्याच अत्याधुनिक व अद्ययावत आहेत. या विस्तारीत इमारतीमुळे रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणार आहेत. वैद्यकीय शिक्षण व विद्यार्थी यांचा सार्वभौम विचार करुन वसतिगृहासह अन्य सुविधांचा या इमारतीमध्ये समावेश करणे गौरवास्पद असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पायाभूत सुविधांच्या बाबतीत खूप कामे सुरू आहेत. उत्तम आरोग्य सुविधेसाठी ७ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. २५० हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना अगदी हाकेच्या अंतरावर आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. या सर्व विकासात्मक बाबींसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांचे आणि संपूर्ण प्रशासनाचे अभिनंदन करतो, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्याच्या भावना व्यक्त केल्या.
नायर दंत महाविद्यालयाप्रमाणे महानगरपालिकेची सर्व रूग्णालये आधुनिक सुविधांनी सज्ज बनविण्यात येणार आहेत. केईएम रूग्णालयात बंद पडलेल्या सहा वॉर्डांची दुरूस्ती करून हे वॉर्ड रूग्णांच्या सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज आहे. यामुळे ३६० खाटांची संख्या वाढली आहे. नायर रुग्णालयाच्या इमारत बांधकामामध्ये २० कोटी रूपयांची बचतही करण्यात आली आहे. ‘झीरो प्रीस्क्रीप्शन’ पॉलीसीच्या माध्यमातून विनामूल्य औषध उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी ३ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. औषधांसाठी एवढी मोठी तरतूद करणारी मुंबई ही जगातील पहिली महापालिका आहे. एका वर्षामध्ये आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी ७ हजार कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. १५० वर्षात १२ हजार खाटा होत्या, शासनाने दीड वर्षात ५ हजार खाटांची संख्या वाढविली आहे. महानगरपालिकेला पैसाही पालिकेच्या कामांसाठीच मिळाला पाहिजे. महानगरपालिकेच्या खर्चानुसार उत्पन्नही वाढले पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.
नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी प्रास्ताविक केले. नव्या विस्तारीत इमारतीतील तंत्रज्ञान आणि सुविधांमुळे रुग्णांवर अधिक उत्तम पद्धतीने उपचार करता येईल, असा विश्वास डॉ. अंद्राडे यांनी व्यक्त केला.
अशी आहे सुविधा
नायर रुग्णालय दंत महाविद्यालयात नियमितपणे सुमारे आठशे ते एक हजार रुग्ण वैद्यकीय उपचारांसाठी येतात. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महानगरपालिकेच्या वतीने रुग्णालयाची अकरा मजली विस्तारित इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीमधील पहिले सहा मजले हे रुग्ण सुविधेसाठी असून उर्वरीत पाच मजले विद्यार्थी वसतिगृहासाठी आहेत. महानगरपालिकेने या इमारतीमध्ये मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, फॅन्टम आणि सिम्युलेटर प्रयोगशाळा, प्री क्लिनिकल प्रयोगशाळा यांच्यासह विविध सुविधा अद्ययावत स्वरुपात उपलब्ध केल्या आहेत. अत्यंत माफक दरामध्ये या सर्व सुविधांचा लाभ रुग्णांना घेता येईल.