राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने नुकताच एक मोठा निर्णय जाहीर केला व त्या नंतर स्टाफरुम मध्ये चर्चेला उधाण आले. मी केवळ स्टाफरुम म्हणतो त्याचे कारण म्हणजे शिक्षक त्याबाहेर आपले मत स्पष्टपणे व्यक्त करु शकत नाही. कारण शिक्षकाला कुठे काय बोलावे? कधी बोलावे, कसे बोलावे व कोणा समोर बोलावे याचे ज्ञान आहे. यासाठी शासकीय परिपत्रकाची शिक्षकाला गरज नाही. सर्व शाळांच्या दृष्टीने एक महत्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या परिपत्रकानुसार आता राज्यभरातील प्रत्येक शाळेत शिक्षकांसाठी ड्रेसकोड लागू होणार आहे. शाळांमध्ये जसा विद्यार्थ्यांना गणवेश असतो तसेच आता शिक्षकांनाही ड्रेसकोड लागू होणार आहे. त्यामुळे आता शिक्षकांनाही शाळेत ठरवून देण्यात आलेले कपडे घालून यावे लागेल. राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी याबाबत महत्वाची घोषणा केली. शाळेत शिक्षकांनी जीन्स, टी-शर्ट वापरू नये, भडक रंगाचे, चित्र विचित्र थोडक्यात आपले कपड्याने लक्ष वेधून घेणारे कपडे घालून शाळेत येऊ नका अशा विशेष सुचना देखील सरकारकडून शाळांना देण्यात आल्या आहेत. शाळेतील शिक्षक, शिक्षिका चित्र विचित्र कपडे घालून येतात, पायात बुट नसतात, त्यामुळे विद्यार्थ्याच्या आचार विचारात परीवर्तन होत आहे अशी आवई कुठल्याही समाज माध्यमांवर, प्रसार माध्यमांवर, अथवा कोणत्याही समाज प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी केली नसताना शिक्षकांसाठी आलेल्या ड्रेस कोडमुळे चर्चेला उधाण आले नसते तर नवलच!
वर्तमान पिढीला मार्गदर्शन करून भविष्यकालीन पिढी घडवण्याचे कार्य करत असतो तो म्हणजे शिक्षक! आज या शिक्षकांच्या अनेक समस्या सरकार दरबारी पडून आहेत. शिक्षक आमदार, लोकप्रतिनिधी यासंदर्भात सभागृहात आवाज उठवला परंतु शिक्षकांच्या समस्या आजही अनेक वर्षे प्रलंबित आहेत. अनुदानाचा प्रश्न असो वाढीव तुकडीचा प्रश्न असो अथवा संच मान्यता अनुदान अशा अनेक प्रश्नांनी शिक्षक त्रस्त आहेत. राज्यात अनेक वर्ष शिक्षक भरती झालेली नाही. नुकतीच शिक्षक भरतीस परवानगी दिली आहे. विद्यार्थी व शिक्षकांचा व्यस्त प्रमाणे अध्ययन – अध्यापन कार्य करत असताना शिक्षकांना अनेक वेळा शैक्षणिक कामाव्यतिरिक्त इतरही अशैक्षणिक कामेही दिली जातात. जनगणना, निवडणुक, शालेय पोषण आहार, विविध सर्वे मतदार याद्या तयार करणे, पटनोंदणी, हत्तीपाय निर्मूलनासाठी सर्वेक्षण, वृक्षारोपण, शाळेची रंगरंगोटी, विद्यार्थ्यांचे बँक खाते, आधार कार्ड काढून देणे, पालकांची सभा, शाळा व्यवस्थापन समिती सभा, शाळेची ऑनलाईन माहिती भरणे, यू डायसवर माहिती भरणे, शैक्षणिक अहवाल तयार करणे, शिष्यवृत्तीबाबत माहिती भरणे, शिक्षण विभागाने मागितलेली माहिती पुरविणे, शालेय पोषण आहार वाटपाची कामे, पोषण आहारच्या नोंदी ठेवणे, धान्यसाठा नोंदविणे, धान्य, साहित्याची मागणी, शाळाबाह्य मुलांचा शोध घेणे, विद्यार्थ्यांना धान्य वितरण करणे, प्रत्येक राष्ट्रीय कामात मदत करणे, अनेक कार्यक्रमांची नोंद घेऊन ती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहचवणे अशी अगणित काम शिक्षक करत असतो.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट स्वतंत्र, सर्जनशील माणूस घडवणे हे आहे. . थोर तत्त्वज्ञ, विचारवंत आणि हाडाचे शिक्षक असणा-या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी, ५ सप्टेंबर रोजी भारतात शिक्षकदिन साजरा केला जातो. आजच्या शिक्षणव्यवस्थेमधले शिक्षकांचे स्थान, त्यांच्या समस्या समजावून घेतल्या पाहिजेत. शिक्षणाच्या माध्यमातून सन 2020 पर्यंत भारताला जागतिक महासत्ता बनवण्याचे भव्य स्वप्न माजी राष्टपती डॉ. अब्दुल कलाम यांनी पाहिले. आज भारतातील सगळी शिक्षणव्यवस्था त्या दिशेने वाटचाल करत आहे आणि त्या स्वप्नपूर्तीमधला सर्वात महत्त्वाचा घटक अर्थातच शालेय पातळीवर शिकवणारा शिक्षक आहे. शिक्षण आयोगाच्या अहवालानुसार भारतात ५,७९,४९६ मान्यताप्राप्त शाळा आहेत. त्यात प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांचा समावेश आहे. या शाळांमधून १९,०९,१८७ इतके शिक्षक शिकवत आहेत. त्यापैकी जवळजवळ ७० टक्के शिक्षक ग्रामीण भागातील शाळांमधील आहेत.
महाराष्टातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शिक्षणाचा प्रसार झाला आहे. खेडोपाडी अनेक शाळा सुरू आहेत. . ग्रामीण भागात काम करणा-या शिक्षकांना तुलनेने जास्त समस्यांना तोंड द्यावे लागते. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून देशात शैक्षणिक क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न चालू आहे. सन २००९ मध्ये मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करण्यात आला. यानुसार ६ ते १४ वयोगटातील सर्व मुलामुलींना शिक्षणाचा हक्क मिळाला आहे. परंतु या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक शिक्षकसंख्या मात्र शासकीय किंवा शासन अनुदानित शाळांमधून अजून उपलब्ध नाही. ३० विद्यार्थ्यांसाठी १ शिक्षक असे प्रमाण अपेक्षित आहे. परंतु एका सर्वेक्षणानुसार सध्या हे प्रमाण ४२ विद्यार्थ्यांसाठी १ शिक्षक असे आहे. शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त ताण पडतो. गेली अनेक वर्षे शाळांना वेतनेतर अनुदान मिळालेले नाही. या वेतनेतर अनुदानातूनच शाळेचा दैनंदिन खर्च भागवला जातो. परंतु हे अनुदान मिळालेले नसल्याने आज ग्रामीण भागातल्या अनुदानित खासगी शाळांमध्ये अतिशय बिकट परिस्थिती आहे. वर्षभर शाळेत चालणारे उपक्रम, पोषण आहार योजना, विविध प्रशिक्षणे, सतत बदलणारे अभ्यासक्रम ही सारी आव्हाने शिक्षक पेलत आहेत. विनावेतन किंवा अत्यल्प वेतनावर शिक्षक काम करत आहेत. आज ना उद्या शासन अनुदान देईल या आशेवर ते आहेत. शिक्षण क्षेत्रातील ही विषमता अस्वस्थ करणारी आणि शिक्षकी पेशाचे अवमूल्यन करणारी आहे.
कोठारी आयोगाच्या अहवालात असे म्हटले आहे. की शाळेच्या वर्गावर्गामधून उद्याचा भारत घडतो आहे. आज हा भारत घडवणारा शिक्षक संभ्रमावस्थेत आहे. शाळेत येताना शिक्षकांनी चांगले कपडे घालावे याबद्दलही माझे दुमत नाही पण शिक्षकांच्या संदर्भात परीपत्रक काढताना शिक्षकांच्या विचारसरणीचा विचार केला पाहिजे होता. राज्यातील अनेक मिशनरी संस्थांच्या अल्पसंख्याक मान्यता प्राप्त शाळा आहेत. एका विशिष्ट समाजाच्या लोकांची कपड्यांची ठेवण, रंगरुप हे वेगळे असते, विशिष्ट धर्माच्या समाजातील लोक हे रंगीबेरंगी, झगमगीत व नजरेत भरणारे कपडे वापरत असतात अशा शाळांमध्ये येणाऱ्या शिक्षकांना ड्रेस कोड लागू होईल का?
राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनांच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांकरीता दैनंदिन पेहराव कशा पध्दतीचा असावा याबाबत मार्गदर्शक सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत : या सुचना पुढील प्रमाणे
१) सर्व शिक्षकांचा दैनंदिन पेहराव हा शिक्षकीय पदास अनुसरुन असावा.
२) सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा, जसे महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार/चुडीदार, कुर्ता, दुपट्टा अशा पध्दतीने पेहराव करावा. तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राऊझर पॅन्ट, शर्ट इन करुन परिधान केलेला असावा. गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम / चित्रे असलेले पेहराव परिधान करु नयेत. तसेच शिक्षकांनी जीन्स व टी-शर्ट चा वापर शाळेमध्ये करु नये.
३) परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा, याची दक्षता सर्व शिक्षकांनी घ्यावी.
४) उक्त प्रमाणे नमूद केल्यानुसार शाळेने सर्व शिक्षकांकरिता एकच ड्रेस कोड ठरविण्यात यावा.
५) पुरुष व महिला शिक्षकांकरीता परिधान करावयाच्या पेहरावाचा रंग कोणता असावा हे संबंधित शाळेने निश्चित करावे.
६) पुरुष शिक्षकांनी परिधान करावयाच्या शर्टचा रंग हा फिकट असावा व पॅन्टचा रंग गडद असावा.
७) महिला व पुरुष शिक्षकांनी पोषाखाला शोभतील अशी पादत्राणे (उदा. पुरुषांनी शूज) यांचा वापर करावा.
८) स्काऊट गाईड च्या शिक्षकांना स्काऊट गाईडचेच ड्रेस राहतील.
९) वैद्यकीय कारण असेल तर पुरुषांना / महिला शिक्षकांना बूट ( शूज ) वापरण्यातून सवलत देण्यात यावी.
या सुचना बरोबरच शिक्षकांना त्यांच्या नावापुर्वी टी लावण्यासाठी मुभा ही देण्यात आली आहे व पत्रकार, डाँक्टर जसे आपल्या वाहनांवर स्टिकर लावतात तसेच आता शिक्षकही आपल्या आपल्या वाहनांवर Tr चे स्टिकर लावणार म्हणे!
राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनांच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांच्या नावापूर्वी इंग्रजी भाषेत “ Tr.” तर मराठी भाषेत “टि” असे संबोधन लावण्यात यावे. तसेच, यासंदर्भातील बोधचिन्ह आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सुनिश्चित करुन त्यास यथोचित प्रसिद्धी देण्यात यावी. सदर संबोधन व बोधचिन्ह शिक्षकांना त्यांच्या वाहनावर लावता येईल.
सदर सूचना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापनांच्या अनुदानित/अंशत: अनुदानित/विनाअनुदानित/स्वयंअर्थसहाय्यित तसेच अल्पसंख्यांक व्यवस्थापनाच्या सर्व बोर्डाच्या व सर्व माध्यमांच्या शाळेतील शिक्षकांना लागू राहतील.
परिपत्रकानुसार लवकरच याची अमलबजावणी होईल यात तिळमात्रही शंका नाही. परंतु नवे शैक्षणिक धोरणच्या अंमलबजावणी प्रशिक्षण, क्रीडांगण, शाळा इमारत व्यवस्थापन निधी, संगीत, कला, शारीरिक शिक्षक नियुक्ती, अनुदान यासारख्या महत्त्वाच्या विषयावर परीपत्रक कधी निघते यावर शिक्षक वर्गाचे लक्ष वेधले आहे. अध्ययन – अध्यापन प्रक्रियेत मात्र शिक्षकांच्या ड्रेस कोडमुळे अमुलाग्राह्य बदल होणार आहे. उद्या चे विद्यार्थी शर्ट इन करुनच घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. विद्यार्थिनी सलवार कमीज व साडीमध्ये फिरताना दिसतील! कारण शिक्षकांना त्यांनी अशाच ड्रेस मध्ये शाळेत पाहिले आहे. ड्रेस कोडमुळे संस्कारक्षम झालेला शिक्षक व विद्यार्थी घडवण्यासाठी सरकारने टाकलेले पाऊल नक्कीच उल्लेखनीय आहे. अशीच प्रगती सरकारने उत्तरोत्तर करावी हीच अपेक्षा शिक्षक करत आहेत. शासनाच्या परीपत्रकामुळे शिक्षण क्षैत्रात फार मोठी क्रांती घडणार आहे! कोणते कपडे कुठे घालायचे याचे भान नसलेल्या शिक्षकांना आता चाफ बसणार आहे म्हणे! आमच्या नेत्यांचे अनुकरण करण्यास हरकत नाही. मला वाटते शिक्षकांनी वर्गात येताना पांढरे शुभ्र खादीचे कपडे व त्यावर नेहरु जॅकेट व शक्य असेल तर गुलाबाचे फुल घालावे. आमच्या नेत्यांच्या आचार विचाराप्रमाणे विद्यार्थ्यांनी वर्तन आचारात आणावे असे शिकवण्यात हरकत नाही असे परिपत्रक लवकरच येईल अशी अपेक्षा बाळगण्यास काहीच हरकत नाही.
- लेखक : उदय नरे (9892755311)