मुंबई :
जरीमरी, साकीनाका येथे एका कट्टरपंथिय गुंडाकडून धार्मिक तेढ निर्माण करुन स्थानिक हिंदू कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. १५ मार्च रोजी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी घटनास्थळी जाऊन पीडित कुटुंबाची चौकशी केली. मंत्री लोढा यांनी सर्व प्रकरण समजून घेऊन हिंदू कुटुंबांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या या गुंडाचे अनधिकृतरित्या उभारलेले ५ मजली घर तोडण्याचे निर्देश दिले. मंत्री लोढा यांच्या निर्देशानुसार महापालिकेने कारवाई सुरु केली असून, या गुंडाच्या घराचा फक्त तळ मजला शिल्लक राहिला आहे.
प्रसंगी बोलताना मंत्री लोढा म्हणाले, “जरीमरी येथील घटनेचा आढावा घेऊन लक्षात आले की, येथेही हिंदूंना त्रास देऊन प्रताडित करण्याचे मालवणी पॅटर्न सुरू आहेत. हे बंद झाले पाहिजे, यासाठी योग्य ती कारवाई करू. येथील भूमीपुत्रांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही.” या भागात स्थानिक हिंदू कुटुंबावर हल्ला करणाऱ्या गुंडाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भिंतीला लागूनच अतिक्रमण करत ५ मजली अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यालगत असलेल्या मंदिरात नित्यनियमाने पूजा करणाऱ्या हिंदू नागरिकांना या गुंडाद्वारे धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने जबरदस्ती त्रास दिला जात होता. स्थानिक नागरिकांनी तब्बल ४० तक्रारी दाखल करून सुद्धा पोलीस या घटनेकडे कानाडोळा करत होते. दिनांक १४ मार्च रोजी या गुंडाने सूड घेण्याच्या भावनेने त्याच्या विरुद्ध तक्रार करणाऱ्या हिंदू नागरिकांवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.