आरोग्य

मुंबईत मागील २ वर्षात क्षयरुग्णांच्या संख्येत घट

मुंबई : 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत क्षयरोग नियंत्रणासाठी सातत्याने हाती घेण्यात आलेल्या विशेष उपक्रमामुळे रूग्णसंख्येत घट झाली आहे. २०२२ आणि २०२३ मध्ये नव्याने आढळलेल्या तसेच एकूण क्षय रूग्णांच्या संख्येतही घट झाली आहे. औषध प्रतिरोध क्षयरोगाचा २०२० मध्ये बरा होण्याचा दर ७२ टक्के इतका असून २०२१ मध्ये हा दर ७७ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

मुंबईत २०२२ मध्ये ५५ हजार २८४ क्षयरूग्ण आढळले होते. तर २०२३ मध्ये या रूग्णांची संख्या ५० हजार २०६ इतकी आढळली आहे. २०२३ मध्ये एकूण १ लाख ८२ हजार ८ इतक्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यामध्ये पुरुष क्षयरुग्ण आणि स्त्री क्षयरुग्ण यांचे प्रमाण जवळपास समान होते. २०२२ मध्ये आढळलेल्या ५५ हजार २८४ रुग्णांमध्ये औषध संवेदनशील क्षयरोग रुग्णाची संख्या ४९ हजार ५८६ तर औषध प्रतिरोधक क्षयरोग रुग्णांची संख्या ५ हजार ६९८ इतकी आहे. यामध्ये लहान मुलांची संख्या ४ हजार २८५ तर फुप्फुसाव्यतिरिक्त १९ हजार ९२० जणांना क्षयरोगाची लागण आहे. त्याचप्रमाणे २०२३ मध्ये आढळलेल्या ५० हजार २०६ रुग्णांमध्ये औषध संवेदनशील क्षयरोग रुग्णाची संख्या ४५ हजार ४१३ तर औषध प्रतिरोधक क्षयरोग रुग्णांची संख्या ४ हजार ७९३ इतकी आहे. यामध्ये लहान मुलांची संख्या ४ हजार ०६६ तर फुप्फुसाव्यतिरिक्त १८ हजार २६६ जणांना क्षयरोगाची लागण आहे. दोन वर्षांच्या आकडेवारीवरून मुंबईतील रूग्णांच्या संख्येत घट झाल्याचे स्पष्ट होते. मुंबईतील रूग्णसंख्येत एकीकडे घट झालेली असतानाच दुसरीकडे मुंबई बाहेरून उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे. २०२२ मध्ये मुंबई बाहेरून उपचारासाठी आलेल्या रुग्णांची संख्या १० हजार ४६३ इतकी होती. २०२३ मध्ये या रुग्णांची संख्या १३ हजार ३६९ इतकी झाली आहे.

क्षयरोगाविरोधात राबविण्यात येतात विविध उपक्रम

सद्यस्थितीत मुंबईत ४२ सीबीनॅट मशीन, २४ ट्रूनॅट मशीन्स, ३ कल्चर आणि डीएसटी लॅब याद्वारे अत्याधुनिक चाचणी सुविधा उपलब्ध आहेत. तसेच २५ सार्वजनिक क्षेत्रातील आणि ६ खाजगी केंद्रांवर औषध प्रतिरोधी उपचारांची सुविधा ही रूग्णांसाठी मोफत उपलब्ध आहे. राष्ट्रीय कार्यक्रम अंतर्गत मुंबईच्या सर्व २४ विभागात प्रौढ बीसीजी लसीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. एप्रिल २०२४ मध्ये आरोग्य स्वयंसेविका आणि आशा सेविकांद्वारे पात्र लाभार्थ्यांचे सर्वेक्षण केले जाईल. मे २०२४ मध्ये लसीकरण केले जाईल. मुंबई जिल्ह्यात २०२२-२०२४ मध्ये ८८ हजार ८९ इतक्या पोषण आहार कीटचे वाटप झाले आहे. त्याचा १९ हजार ८१८ क्षयरुग्णांना लाभ झाला आहे. तसेच कार्यक्रमामध्ये सहभागी असलेल्या निवडक खाजगी डॉक्टर आणि खाजगी रुग्णालयांमध्ये सुद्धा क्षयरुग्णांचे निदान व उपचार मोफत उपलब्ध आहेत.

क्ष- किरण सेवेमुळे ९२१ संभाव्य रुग्ण सापडले

कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित क्ष-किरण सेवेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. संशयित क्षयरुग्ण तीन मिनिटांच्या आत ओळखण्यासाठी गत दोन वर्षात ‘क्षयरोग रोखा’ आणि क्युर एआयच्या भागीदारीत या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या तंत्रज्ञानाद्वारे एकूण ९० हजार ७५१ क्ष-किरण काढण्यात आले असून ९२१ एवढे क्ष-किरणांमध्ये संभाव्य क्षयरुग्ण आढळले आहेत. तसेच या सर्व क्षयरुग्णांचा वैद्यकीय पाठपुरावा करण्यात येत आहे.

थुंकी नमुना मागोवा घेण्यासाठी प्रणाली सुरू करणार

थुंकी नमुना घेऊन वैद्यकीय चाचणी करताना मागोवा घेण्यासाठी क्युआर कोड आधारित प्रणालीची पथदर्शी यशस्वी चाचणी केल्यानंतर मुंबईतील सर्व विभागांमध्येही प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. चाचणी करण्यासाठी लागणारे नमुने आणि चाचणी करण्यासाठी लागलेला प्रत्यक्ष वेळ यावर देखरेख ठेवण्यासाठी मदत होईल.

मुंबईत क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी २४ विभागात प्रभावी जनजागृती मोहीम राबवली जात आहे. अतिजोखीम गटातील रूग्णांचे बीसीजी लसीकरण, रूग्णांचा आहार आणि रूग्ण शोधण्यासाठी अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

– डॉ. दक्षा शहा, कार्यकारी आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई महानगरपालिका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *