मुंबई :
मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या रुग्णालयामध्ये हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम (एचएमआयएस) प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, त्यासाठी कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. एचएमआयएस ही प्रणाली २०२५ पासून लागू होणार असून, ही प्रणाली लागू होताच पालिका रुग्णालयांमधील कारभार हा पेपरलेस होणार आहे.
एचएमआयएस प्रणालीमध्ये रुग्णांची नोंदणी केल्यानंतर त्याला एक विशिष्ट क्रमांक मिळतो. त्यामुळे रुग्णांना केस पेपरची आवश्यकता लागत नाही. यामध्ये रुग्णांच्या आरोग्याचा इतिहास, अहवाल आणि देण्यात येत असलेली औषधे यांची सविस्तर माहितीची नोंद करण्यात येते. त्यामुळे कोणताही रुग्ण डॉक्टरकडे आल्यावर रुग्ण त्याच्यापासून कोणतीही माहिती लपवून ठेऊ शकत नाही. तसेच रुग्णाला पुढील भेटीत डॉक्टरांना आराेग्य इतिहास सांगण्याची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे रुग्ण आणि डॉक्टर दोघांचाही वेळ वाचणार आहे. रुग्णांची माहिती गोळा करून आजाराचे संक्रमण आणि ट्रेंड कळेल, ज्यामुळे रोगांचे प्रतिबंध आणि उपचारांसाठी योजना तयार करण्यात सरकारला मदत होईल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
या प्रकल्पांतर्गत ११२ दवाखाने, ३० प्रसूतिगृहे, १६ उपनगरांतील रुग्णालये, पाच विशेष रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालय असलेले दंत रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुविधांसह प्रमुख रुग्णालयांमध्ये ही प्रणाली लागू करण्यात येणार आहे.