शिक्षण

मैदानाच्या दुरवस्थेवरून आमदार सुनील राणे यांनी मुंबई विद्यापीठांच्या कुलगुरूंना धरले धारेवर

पुढील दोन वर्षांत मुंबई विद्यापीठांच्या मैदानांचा होणार कायापालट

मुंबई :

मुंबई विद्यापीठातील विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करत असताना विद्यापीठाच्या मरीन लाईन्स येथील मैदानाची दुरवस्था झाल्याचा मुद्दा मुंबई विद्यापीठाचे अधिसभा सदस्य विधानसभा आमदार सुनील राणे यांनी शनिवारी वार्षिक अधिसभेमध्ये उपस्थित करत कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांना धारेवर धरले. यावर मुंबई विद्यापीठाच्या मरीन लाईन्स, कलिना आणि ठाण्यातील मैदानाचा पुढील दोन वर्षांत कायापालट करण्यात येणार असल्याचे कुलगुरू यांनी स्पष्ट केले.

मुंबई विद्यापीठाच्या भविष्यातील योजनांबाबत स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या प्राचार्य अनिता कनवर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नावर कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी विविध मुद्द्यांचे स्पष्टीकरण देताना मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करतील अशा सोयीसुविधा त्यांना उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित असलेले बोरिवली विधानसभेचे आमदार सुनील राणे यांनी हा मुद्दा अधोरेखित करत राष्ट्रीय पातळीवर विद्यार्थी सुवर्ण कामगिरी करत असताना मुंबई विद्यापीठाच्या मरीन लाईन्स येथील मैदानाच्या दुरवस्थेचा मुद्दा चव्हाट्यावर आणला. या मैदानाकडे बघणेही मुश्किल असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. मरिन लाईन्स मैदानाबरोबरच त्यांनी कलिना येथील मैदानाच्या दुरवस्थेबाबत अधिसभेत प्रश्न उपस्थित करत कुलगुरूंना धारेवर धरले. या मैदानांच्या डागडुजीसाठी कोणती उपाययोजना करणार आहात, आराखडा तयार केला आहे का? अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे का? असे प्रश्न उपस्थित करत आमदार सुनील राणे यांनी मुंबई विद्यापीठ स्वत:च्या मैदानाच्या डागडुजीकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांना धारेवर धरले.

त्यावर कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी मरिन लाईन्स येथील मैदानाबरोबरच कलिना व ठाण्यातील मैदानांचाही विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधी उपलब्ध होणार आहे. मैदानाच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आला असून, पुढील दोन वर्षांत त्यांचा कायापालट झाल्याचे दिसून येईल. मरिन लाईन्स येथील मैदानाच्या विकासासाठी टाटा ग्रुपकडूनही निधी उपलब्ध होणार असल्याचे कुलगुरूंनी सांगितले. तसेच मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांमधून चांगले खेळाडू घडावेत यासाठी मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात एक हजार खेलो इंडिया केंद्र उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *