मुंबई :
सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात ‘सेट’ परीक्षा ही ०७ एप्रिल २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आणि मुंबई विद्यापीठाच्या समन्वयाने मुंबई विद्यापीठाशी संलग्नित विविध २८ महाविद्यालयातील केंद्रावर ही परीक्षा पार पडणार आहे. या परीक्षेसाठी एकूण १४ हजार ४२६ एवढे परीक्षार्थी आहेत. या परीक्षेसाठीची प्रवेश पत्रे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिली गेली आहेत. मुंबई विद्यापीठात आयोजित होत असलेल्या या परीक्षेच्या यशस्वी नियोजनासाठी मुंबई शहर केंद्र प्रमुख म्हणून इंग्रजी विभागातील प्राध्यापक डॉ. शिवाजी सरगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित मुंबई शहर आणि मुंबई उपनगरे जिल्ह्यातील एकूण २८ महाविद्यालयातील केंद्रावर ही परीक्षा सुरळीतरित्या पार पडण्यासाठी आवश्यक ते सर्व नियोजन करण्यात आले असून सर्व केंद्र प्रमुखांना योग्य त्या सूचनाही देण्यात आल्या असल्याचे प्राध्यापक डॉ. शिवाजी सरगर यांनी सांगितले. तसेच परीक्षार्थी यांची परीक्षेसंबंधीत कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी 9869028056 या क्रमांकावर संपर्क साधता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.