आरोग्य

उष्माघात बाधित रूग्णांसाठी महानगरपालिकेच्या रूग्णालयांमध्ये शीत कक्ष सुरू

१०३ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांमध्ये वातानुकूलन सुविधा

मुंबई :

शहरातील तापमानाच्या वाढत्या पाऱ्यामुळे उष्माघातासारखे प्रकार होऊ नये यासाठी, मुंबई महानगरपालिकेने उष्माघात प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असताना आता १४ रूग्णालयात उष्माघात बाधित रूग्णांसाठी शीत कक्ष असलेली दोन रुग्ण खाटा उपलब्ध केल्या आहेत. तसेच १०३ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांमध्येही वातानुकूलित व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाणे प्रमुख रुग्णालये, सर्वसाधारण रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयांमध्ये उष्माघात बाधित रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.

येत्या काळात संभाव्य उष्णतेची लाट आणि उष्माघात यासारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश बृहन्‍मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले आहेत. मुंबईतील प्रमुख तसेच सर्वसाधारण आणि वैद्यकीय रूग्णालयात मार्गदर्शन व उपचाराची सुविधा सुसज्ज ठेवण्याच्या सूचना डॉ. शिंदे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधारण रुग्णालयात व वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात उष्माघात बाधित व्यक्ती आल्यास त्यांच्यावर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यासाठी महानगरपालिकेच्या १४ रुग्णालयात उष्माघात रुग्णाकरीता थंड हवेची व्यवस्था किंवा शीत कक्ष असलेली दोन रूग्ण खाटांची व्यवस्था तसेच आवश्यक औषधांची उपलब्धता करण्यात आलेली आहे. उर्वरित रुग्णालयात वातानुकूलन एअर कंडिशनर आणि कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे.

अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला प्रशिक्षण

महानगरपालिकेच्या रुग्णालयातील आणि दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना उष्माघात नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचनांबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. उष्माघातावरच्या उपाययोजनांवर मार्गदर्शन, उपचार आणि घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये प्राथमिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

एप्रिल आणि मे मध्ये तापमान तुलनेने अधिक असते. त्यामुळे नागरिकांना विशेषतः लहान मुले, वयोवृद्ध आणि घराबाहेर काम करणाऱ्या नागरिकांना उष्माघात होण्याची शक्यता असते. उष्माघात झाल्यास घ्यावयाची काळजीबाबत जनजागृती करत नागरिकांना माहिती देण्यात येत आहे.
– डॉ. दक्षा शहा, कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महानगरपालिका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *